पोलिसांनी आधुनिकतेला लोकाभिमुखतेची जोड द्यावी

By Admin | Updated: September 16, 2015 03:41 IST2015-09-16T03:41:43+5:302015-09-16T03:41:43+5:30

पोलीस ठाण्यातील कामकाज पेपरलेस आणि आॅनलाईन करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे,...

Police should give modern people an attachment to the people | पोलिसांनी आधुनिकतेला लोकाभिमुखतेची जोड द्यावी

पोलिसांनी आधुनिकतेला लोकाभिमुखतेची जोड द्यावी

नागपूर : पोलीस ठाण्यातील कामकाज पेपरलेस आणि आॅनलाईन करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ‘क्राईम अ‍ॅन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम‘ (सीसीटीएनएस) प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी पार पडला. येथील आयटी पार्कमधील पर्सिस्टंट सिस्टीम्स आॅडिटोरियममध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर महापौर प्रवीण दटके, खासदार अविनाश पांडे, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) सुधीरकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी, पोलीस महासंचालक संजीव दयाल, अतिरिक्त महासंचालक बिपीन बिहारी, विभागीय आयुक्त अनुपकुमार तसेच ब्रजेश सिंह (स्पेशल आयजी, सीआयडी) उपस्थित होते.
गृहमंत्रालयाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यातील पोलीस दलाला आधुनिक करण्यासोबतच दर्जात्मक सेवेला प्राधान्य देण्याचा आपण निर्णय घेतला. सीसीटीएनएस हा त्याचाच एक भाग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यापुढेही महाराष्ट्र पोलीस दलाला ‘डिजिटलयाझेशन‘कडे झपाट्याने वाटचाल करायची आहे. मात्र, या आधुनिकतेला लोकाभिमुखतेची जोड असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पोलीस शिस्तीचे दल आहे, याचा अर्थ पोलिसांनी दूर शिस्तीत उभे राहावे असे नव्हे. तर, लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्यात मिसळून पोलिसांनी काम केले तर अधिक चांगले परिणाम समोर येतील. लोकांना ठाण्यात किंवा पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारायला लावण्यापेक्षा घरबसल्या त्यांना परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळाले तर नागरिकांचा त्रास वाचेल आणि पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सीसीटीएनएसमुळे सायबर, व्हाईट कॉलर क्राईम रोखण्यास मदत होईल.
हा प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्यासाठी गृह विभाग, वित्त विभागाच्या शिर्षस्थांनी मोलाची मदत केल्याचे सांगून त्यांचे तसेच पोलीस महासंचालक संजीव दयाल यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक केले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहाचे लोकार्पण
आयटी पार्क येथे असलेल्या पसर््िास्टंट स्पेस सिस्टीम या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग समूहातर्फे सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहाला दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. संबंधित सभागृहाचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वेळी खा. अविनाश पांडे, खा. अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, आ. आशिष देशमुख, पसर््िास्टंटचे समीर बेंद्रे, राजेश जेठपूरकर, एअर मार्शल दत्तात्रय पांडे उपस्थित होते. या सभागृहाची आसनक्षमता १७० ची असून डिजिटलायजेशनसह सर्व अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध असल्याचे बेंद्रे यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाची पाहणी केली व येथे बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरणही केले.

१०४१ पोलीस ठाणी, पोलीस अधिकाऱ्यांची ६३८ कार्यालये संलग्न
प्रारंभी पोलीस महासंचालक दयाल यांनी सीसीटीएनएसची माहिती देताना या प्रणालीमुळे राज्यातील १०४१ पोलीस ठाणे तसेच ६३८ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये संलग्न झाल्याचे सांगितले. एका क्लिकमध्ये विशिष्ट वर्गातील प्रत्येक गुन्हेगाराची माहिती उपलब्ध होणार असल्यामुळे गुन्ह्याचा तातडीने छडा लावणे सोपे होणार असल्याचे ते म्हणाले. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी दीड लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, तक्रार दाखल होण्यापासून गुन्ह्याच्या तपासाच्या प्रगतीपर्यंतची माहिती मिळणार आहे. या प्रणालीमुळे खऱ्या अर्थाने ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीद सार्थ करता येईल, असे दयाल म्हणाले. प्रणालीच्या पूर्णत्वात विशेष सहकार्य करणाऱ्यांना दयाल यांनी धन्यवाद दिले. सीआयडीचे विशेष महानिरीक्षक आणि या प्रणालीचे नोडल अधिकारी ब्रजेश सिंग यांनी उपस्थितांना प्रणालीची सचित्र ओळख करून दिली. अतिरिक्त मुख्य सचिव बक्षी आणि श्रीवास्तव यांनीही आपल्या छोटेखानी भाषणातून प्रणालीची उपयुक्तता विशद केली. सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी आभार प्रदर्शन केले.

केसडायरी कोर्टात नेणे बंद व्हावे
गुन्ह्याची नोंद असलेली केस डायरी कोर्टात घेऊन जाण्याचा प्रकार आता बंद व्हावा. त्याऐवजी कोर्टातील उपलब्ध संगणकावरच केस डायरी ‘ओपन’ करून प्रत्येक माहिती आॅनलाईन दाखवता आली पाहिजे. अर्थात पोलिसांच्या कार्यपद्धतीत दर्जात्मक सुधार व्हावा, असा हितोपदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केला.
स्मार्ट अ‍ॅन्ड सेफ सिटी कन्व्हीक्शन रेटही वाढेल
राज्यातील स्मार्ट सिटी केवळ स्मार्टच नव्हे तर सेफसुद्धा बनाव्यात, असा आपला मानस आहे. सीसीटीव्हीच्या नजरेत असलेले पुणे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिले शहर ठरले आहे. काही दिवसातच मुंबईच्या पहिल्या झोनचे काम पूर्णत्वास येणार असून, पुढच्या काही महिन्यात राज्यातील सर्व मोठ्या शहरात सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा तात्काळ सुगावा लागेल आणि त्यांना शोधण्यास मदत होईल. गुन्हेगार सीसीटीव्हीत कैद होणे हा भक्कम पुरावा ठरेल आणि त्याआधारे त्याला शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढेल. परिणामी कन्व्हीक्शन रेट वाढण्यास मदत होईल. गुन्ह्याची कडक शिक्षा मिळते, असे लक्षात आल्यानंतर गुन्हेगार धजावणार नाही, असे विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी केले.

Web Title: Police should give modern people an attachment to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.