शहरभर सांभाळला पोलिसांनी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:09 IST2021-02-12T04:09:26+5:302021-02-12T04:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - ऐनवेळी हल्ला अथवा कोणती मोठी आपत्ती ओढवल्यास परिस्थिती कशी निपटून काढायची, त्याची चाचपणी करण्याच्या ...

शहरभर सांभाळला पोलिसांनी मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - ऐनवेळी हल्ला अथवा कोणती मोठी आपत्ती ओढवल्यास परिस्थिती कशी निपटून काढायची, त्याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने शहरात १० ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मॉकड्रिल करण्यात आली. त्यामुळे कुठे दंगलखोरांना अटकाव करण्यात आला तर कुठे बंदूकधारी पोलीस सतर्कपणे कर्तव्य बजावताना आढळले.
अचानक अनपेक्षित स्थिती निर्माण झाल्यास ती कशी हाताळायची, त्याचा पूर्वअभ्यास सुरक्षा दलाकडून वेळोवेळी होत असतो. त्याला मॉकड्रिल म्हटले जाते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात आज अशीच मॉकड्रिल रेशीमबागेतील संघ मुख्यालयाच्या समोरच्या परिसरात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, काही वेळेसाठी मार्ग बंद करण्यात आले.
काछीपुरा आणि सोनेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दंगेखोर हैदोस घालत असल्याची माहिती देऊन दुपारी १२ वाजता पोलिसांना सतर्क करण्यात आले. ठाणेदार महेश चव्हाण यांच्यासह १२ पोलीस अधिकारी, ३७ कर्मचारी तसेच वाहतूक शाखेच्या ११ पोलिसांनी या भागात मॉकड्रिल केली. मदतीला ११ वाहने होती. हा तामझाम नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरला. नंतर ही मॉकड्रिल असल्याचे कळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. सोनेगाव, प्रतापनगर, अंबाझरी, जरीपटका, अजनी, सक्करदरा, जुनी कामठी आणि नवीन कामठी परिसरातही मॉकड्रिल घेण्यात आली.
----