‘रोडीज’वरून पोलिसांचे उपटले कान

By Admin | Updated: June 10, 2014 01:09 IST2014-06-10T01:09:29+5:302014-06-10T01:09:29+5:30

‘एम’ टीव्हीवर प्रसारित होणार्‍या ‘रोडीज’ मालिकेवरील आरोपांची योग्य पद्धतीने चौकशी केली जात नसल्याचे आढळल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जरीपटका पोलिसांचे कान उपटले.

Police raided ears from 'Roadies' | ‘रोडीज’वरून पोलिसांचे उपटले कान

‘रोडीज’वरून पोलिसांचे उपटले कान

हायकोर्ट : तपास अधिकार्‍याला न्यायालयात बोलावले
नागपूर : ‘एम’ टीव्हीवर प्रसारित होणार्‍या ‘रोडीज’ मालिकेवरील आरोपांची योग्य पद्धतीने चौकशी केली जात नसल्याचे आढळल्यामुळे मुंबई उच्च  न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जरीपटका पोलिसांचे कान उपटले.
याप्रकरणावर आज, सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने तपासाबाबतच्या  स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्त करून केस डायरी मागवली. दुपारी २.३0 वाजता केस डायरी पटलावर सादर करण्यात आली. केस डायरीचे  अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने सहायक सरकारी वकिलावर दिशाभूल करीत असल्याचे ताशेरे ओढून पोलीस आयुक्तांना बोलावण्याची तंबी  दिली. यानंतर सहायक सरकारी वकिलाने अचूक माहिती सादर करण्यासाठी एक दिवसाचा वेळ देण्याची विनंती केली होती. परंतु, न्यायालयाने  प्रकरणावरील सुनावणी दोन दिवसांसाठी तहकुब केली. तसेच, पुढील तारखेला तपास अधिकारी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी व्यक्तीश: उपस्थित  राहण्याचे निर्देश दिले.
बचनसिंग लालसिंग बाबरा यांनी ‘रोडीज’विरुद्ध फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. ‘रोडीज’ मालिका तरुणांसाठी धोकादायक आहे. मालिकेत  अर्धनग्न चित्रीकरण, शिवीगाळ इत्यादी वाईट बाबींचा समावेश असतो. परिणामी युवा पिढीवर वाईट परिणाम होतो, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे  आहे. ७0 वर्षीय बाबरा यांनी सुरुवातीला ‘रोडीज’ मालिकेविरुद्ध जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही  म्हणून त्यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार दिली. त्यावरही काहीच झाले नाही. परिणामी त्यांनी ‘एम’ टीव्हीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी फौजदारी प्रक्रिया  संहितेच्या कलम १५६ (३) अंतर्गत जेएमएफसी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. जेएमएफसी न्यायालयाने मार्च-२0१३ मध्ये ‘एम’  टीव्हीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले होते. यानंतर दोन महिन्यांनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला, पण  त्यापुढे कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नाही, अशी माहिती याचिकेत देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अँड. रसपालसिंग रेणू  यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Police raided ears from 'Roadies'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.