योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राज्य शासनाने अनेक वर्षांअगोदर डान्सबार बंदी केली असली तरी नागपुरात लपूनछपून बारमध्ये छमछम सुरू होती. पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका डान्सबारचा भांडाफोड केला. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बारबाला नाचत होत्या व ग्राहकांकडून त्यांच्यावर नोटा उडविणे सुरू होते. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल २१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरात अशाप्रकारे सुरू असलेल्या डान्सबार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सेंट्रल एमआयडीसी मार्ग येथील एस बार ॲंड रेस्टॉरेन्ट येथे हा प्रकार सुरू होता. तेथे डान्सबार सुरू असल्याची पोलीस उपायुक्त लोहित मतानि यांच्या पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे रविवारी मध्यरात्री धाड टाकली असता तेथे कर्णकर्कश डीजेच्या आवाजात काही मुली नाचत होत्या व काही ग्राहक त्यांच्यावर नोटा उडवत होते. तर काही ग्राहक काऊंटरजवळ बसून मद्यप्राशन करत होते. पोलिसांच्या पथकाला पाहताच तेथे पळापळ झाली. संबंधित बार जय बलदेव हिराणी (४२, पांडे ले आऊट) याच्या मालकीचा आहे. काही ‘कनेक्शन’ वापरून त्याने बऱ्याच दिवसांपासून हा प्रकार सुरू केला होता असे सांगितले जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणात त्याच्यासह एकूण २१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात बारचा व्यवस्थापक राजु लालचंद झांबा (५९, महादेव हाईट्स, नारा जरीपटका), कॅशिअर देवेन्द्र रामकृष्ण शेन्डे (३८, एकात्मतानगर, जयताळा), निलेश ब्रिजलाल उईके (३५, स्वागतनगर), शिशुपाल दत्तात्रय देशमुख (३५, तेलकामठी, कळमेश्वर), गौरव अरूण फलके (३२, तेल कामठी, कळमेश्वर), गोपाल हेमराज दडवी (३३, किल्ला, महाल), विशाल विजय नाईक (४०, स्नेहनगर), श्रीकांत हिरालाल नगरारे (४६, चंदननगर), आशिष सुरेन्द्र प्रधान (४२, वर्धमाननगर), गणेश उर्फ घुई आनंदराव चाचेरकर (४०, गोरेवाडा जुनी वस्ती), दीपक मोहनलाल जैस्वाल (५३, तुळशीबाग, महाल), प्रशांत सुर्यभान वंजारी (४२, नारा, निर्मल कॉलनी), अभिषेक विजय इंगळे (४०, रामदासपेठ), जेम्स विजय डेनी (३१, वंजारीनगर), रामसिंग गंगाचरण ठाकुर (५९, दत्तवाडी, त्रिलोकनगर), शेखर शांताराम मोहीते (४२, हिंगणा नाका), नितीन दयानंद शिंदे (४२, हिंगणा नाका), मिलींद विश्वनाथ वाडेकर (५७, हिंगणा नाका), राहुल विकास रामटेके (३२, हिंगणा नाका) व उमेश रोहीत सापा (२५, हिंगणा नाका) यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र हाॅटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष (बार रूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबतच्या अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एस बार ॲंड रेस्टॉरेन्टमध्ये नृत्य करणाऱ्या बारबालांकडे कुठलेही ओळखपत्र नव्हते. बारमधील संपूर्ण खर्चाचा हिशेब लॅपटॉपमध्ये नोंदविला जात होता अशीही माहिती आहे.