दारुभट्टीवर पोलिसांची धाड
By Admin | Updated: October 7, 2016 03:10 IST2016-10-07T03:10:29+5:302016-10-07T03:10:29+5:30
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने सावनेर तालुक्यातील केळवद, तिडंगी (पारधीबेडा) व उमरी खदान

दारुभट्टीवर पोलिसांची धाड
साडेतीन लाखांचा ऐवज जप्त : नागपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने सावनेर तालुक्यातील केळवद, तिडंगी (पारधीबेडा) व उमरी खदान (पारधीबेडा) येथील मोहफुलांच्या दारुभट्टीवर धाड टाकली. त्यात एकूण ३ लाख ६२ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मोहफुलांचा दारूसाठा व रसायन नष्ट करण्यात आले. ही कारवाई गुरुवारी सकाळी करण्यात आली.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून मोहफुलांच्या दारुभट्टींवर धाड टाकून मोहफुलांच्या दारूविक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत सावनेर तालुक्यातील केळवद व खापा पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी केळवद, तिडंगी येथील पारधीबेडा आणि बोरगाव जंगलातील उमरी खदान येथील पारधी बेड्यावर धाड टाकली. या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोहफुलांची दारू काढण्यात येत असल्याचे आढळून येताच पोलिसांनी तिन्ही ठिकाणी आढळून आलेली मोहफुलांची दारू, दारू तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेले रसायन (सडवा) आणि इतर साहित्य जप्त करून ते नष्ट केले. या तिन्ही ठिकाणी दारुभट्टी चालविणाऱ्या आरोपींविरुद्ध एकूण २४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३ लाख ६२ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापूर्वी विशेष पथकाने उमरेड आणि काटोल तालुक्यात धाडी टाकल्या. त्या धाडीमध्ये दारूसाठा नष्ट केला. तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मोहफुलांची भट्टी चालविणाऱ्यांसह अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
सावनेर तालुक्यातील ही कारवाई पोलीस अधीक्षक अनंत रोकडे व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर, केळवदचे ठाणेदार योगेश पारधी, खाप्याचे ठाणेदार प्रवीण वांगे, उपनिरीक्षक सिद्धेश्वर भरणे, राठोड, यादव यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मच्याऱ्यांनी पार पाडली. (जिल्हा प्रतिनिधी)