पोलीस अधिकारी का टिकत नाहीत?
By Admin | Updated: January 6, 2017 02:22 IST2017-01-06T02:22:23+5:302017-01-06T02:22:23+5:30
गेल्या २४ तासांत नागपुरातील सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त प्रतापसिंह पाटणकर

पोलीस अधिकारी का टिकत नाहीत?
बदल्यांचा पोरखेळ नागपुरात कशी टिकेल कायदा व सुव्यस्था २४ तासांत चार बदल्या
नरेश डोंगरे नागपूर
गेल्या २४ तासांत नागपुरातील सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त प्रतापसिंह पाटणकर, उपायुक्त एम. राजकुमार आणि उपायुक्त जी. श्रीधर या चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली. महाराष्ट्राची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मुदतीच्या आतच बदल्या होत आहेत. यापूर्वी अतिरिक्त आयुक्त सुहास वारके यांचीही अशीच ध्यानीमनी नसताना तीनच महिन्यात नागपुरातून बदली झाली होती. त्यामुळे कायदा व सुव्यस्था सांभाळण्यास हे अधिकारी कमी पडतात की नागपूरपेक्षा दुसऱ्या ठिकाणी त्यांची जास्त गरज आहे, असा प्रश्न चर्चेला आला आहे. सोबतच वारंवार होणाऱ्या या मुदतपूर्व बदल्यांमुळे नागपुरातील कायदा व सुव्यवस्था कशी टिकेल आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील हे शहर कसे आकारास येईल, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. मिहान, मेट्रोसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासोबत उपराजधानीत अत्याधुनिक साधनसुविधा निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. नागपुरातील पोलीस दल आधुनिक तसेच सक्षम करण्यासाठीही त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न चालवले आहेत. मात्र, कायदा व सुव्यस्था राखण्याची प्रत्यक्ष जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वारंवार मुदतीच्या आत बदल्या होत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहखात्याबद्दल नकारात्मक संदेश जाण्याची भीती आहे.
सहपोलीस आयुक्त म्हणून संतोष रस्तोगी अवघ्या पाच महिन्यांपूर्वी नागपुरात रुजू झाले. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना बहुचर्चित २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास रस्तोगी यांनी केला. अत्यंत हुशार अन् सौजन्यशील अधिकारी म्हणून रस्तोगी ओळखले जातात.
नागपुरातील बहुचर्चित डब्बा प्रकरणाच्या तपासात त्यांची मोलाची मदत होईल, अशी अपेक्षा असतानाच त्यांची गुरुवारी अचानक बदली झाली.
रस्तोगी यांच्या बदलीच्या २४ तासपूर्वी परिमंडळ तीनचे उपायुक्त एम. राजकुमार आणि परिमंडळ चारचे उपायुक्त जी. श्रीधर यांची अनुक्रमे यवतमाळ आणि बीडला पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. हे दोन्ही अधिकारी जून २०१५ मध्ये नागपुरात रुजू झाले होते. दोघेही तरुण अन् धडाकेबाज अधिकारी होते. त्यांच्या त्यांच्या परिमंडळात त्यांनी नुकताच कुठे धाक निर्माण केला होता.
आता त्यांची बदली झाल्याने पुन्हा एकदा या दोन्ही परिमंडळातील गुन्हेगार सैराट सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्वांवर कळस म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले प्रतापसिंह पाटणकर यांचीही बदली झाली आहे. पदोन्नतीवर त्यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
यापूर्वी आॅगस्टमध्ये रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त सुहास वारके यांची अवघ्या तीन महिन्यात येथून बदली झाली होती. विशेष म्हणजे नागपुरात काही पोलीस अधिकारी असे आहेत की ज्यांच्या सेवाकाळाची मुदत कधीचीच पूर्ण झाली आहे. त्यांना त्यांच्या बदलीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. मात्र, त्यांची बदली होण्याचे नाव नाही. त्यामुळे ‘हे अधिकारी’ नागपुरात अपेक्षेपेक्षा जास्त चांगले काम करीत असल्यामुळे त्यांची बदली केली जात नसल्याचे बोलले जात आहे.