जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाही ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 03:09 IST2016-04-30T03:09:36+5:302016-04-30T03:09:36+5:30
जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवणे, आपसांत समन्वय ठेवण्यासाठी व्हाटस्अॅप व ई-मेलचा वापर करणे, यासोबतच ...

जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाही ‘स्मार्ट’
अधिकाऱ्यांना मिळाला ‘टॅब’ : पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण
नागपूर : जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवणे, आपसांत समन्वय ठेवण्यासाठी व्हाटस्अॅप व ई-मेलचा वापर करणे, यासोबतच पेपरलेस काम करण्याच्या उद्देशाने पोलीस अधिकारी, ठाणेदार आणि शाखा प्रमुखांना टॅब आणि स्मार्ट फोन देण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात टॅबसह स्मार्ट फोनचे वितरण करण्यात आले.
नागपूर ग्रामीणच्या टेकानाका येथील पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपअधीक्षक (गृह) रतनसिंग यादव, रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साळुंके, कामठीचे मंगेश शिंदे, काटोलचे ईश्वर कातकडे, सावनेरचे सुरेश भोयर यांच्यासह ठाणेदार, शाखा प्रमुख उपस्थित होते.
पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार ‘प्रतिसाद अॅप’ नागपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. या अॅपचे संचालन करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदारांना स्मार्ट फोन आणि टॅब देण्यात आले. या अॅपची तसेच स्मार्ट फोनमुळे आपसात संवाद ठेवून कामकाजात सुसूत्रता आणण्यात नक्कीच मदत होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अनंत रोकडे म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील बिट अंमलदार यांनाही भविष्यामध्ये स्मार्ट फोन देण्याचा मानस आहे. यामुळे ठाणेदार आणि बिट अंमलदार यांना कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करता येईल. जिल्ह्यातील हिंगणा, जुनी कामठी, नवीन कामठी पोलीस ठाण्याचे काही दिवसांतच नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात हस्तांतरण करण्यात येणार आहे. तर खापरखेडा, देवलापार व कन्हान या पोलीस ठाण्यासाठी इमारत बांधली जाणार आहे, असे सांगितले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार, शाखा प्रमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)