पोलीस दल ‘स्मार्ट’ बनविणार

By Admin | Updated: November 30, 2015 02:33 IST2015-11-30T02:33:06+5:302015-11-30T02:33:06+5:30

पोलीस दलाचे केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही. तर, मनुष्यबळासोबतच माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्य पोलीस दलाला ‘स्मार्ट ’बनविण्यावर आपला भर आहे.

The police force will make 'smart' | पोलीस दल ‘स्मार्ट’ बनविणार

पोलीस दल ‘स्मार्ट’ बनविणार

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : मनुष्यबळासोबत माहिती व तंत्रज्ञानाची जोड
नागपूर : पोलीस दलाचे केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही. तर, मनुष्यबळासोबतच माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्य पोलीस दलाला ‘स्मार्ट ’बनविण्यावर आपला भर आहे. यामुळे कमी मनुष्यबळात नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यात यश मिळेल आणि गुन्हेगारांवरही जरब बसविणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पोलीस नियंत्रण कक्षातील अद्ययावत ‘डीसीआरएमएस डायल १००’ प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी सकाळी केले. याप्रसंगी ते बोलत होते. या निमित्त नियंत्रण कक्ष परिसरात आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, आमदार प्रकाश गजभिये, आमदार सुधाकर देशमुख मंचावर उपस्थित होते.
ही अत्याधुनिक यंत्रणा नागपूर पोलिसांनी सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रारंभीच पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले. डीसीआरएमएस डायल १००, सीसीटीव्ही प्रणालीमुळे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचतील. गुन्हेगारांना जेरबंद करून ते गुन्ह्यांचा तातडीने उलगडा करू शकतील आणि कोर्टात गुन्हेगारांविरुद्ध ठोस पुरावे सादर करून दोष सिद्धतेचे प्रमाण वाढवता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर सीसीटीव्ही नेटवर्क लावण्याबाबत तत्कालीन सरकारने निर्णय घेतला. मात्र, त्याची पूर्तता करण्यात कमालीची दिरंगाई झाली. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या चार महिन्यांत आम्ही वर्क आॅर्डर दिली आणि सीसीटीव्ही नेटवर्कचा पहिला फेज ( १२०० कॅमेऱ्यांचा) पूर्ण झाला. त्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडणार आहे. सीसीटीव्ही नेटवर्कचा उर्वरित टप्पा आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करू. त्यानंतर जगातील सर्वात मोठे, चांगले आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क मुंबईचे मानले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नागपुरात वर्षभरात सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी जुन्या यंत्रणेतील दोष आणि नवीन यंत्रणेची वैशिष्ट्ये विशद केली.

नव्या प्रणालीमुळे होणारे फायदे
या नवीन यंत्रणेमुळे अनेक फायदे होतील. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचतील.
पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर काय कारवाई झाली, त्याची माहिती संबंधित व्यक्तीला एसएमएसच्या माध्यमातून मिळेल.
नियंत्रण कक्षात विनाकारण फोन करून खोटी माहिती देणाऱ्या, पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांना शोधून काढणे शक्य असल्यामुळे हे गैरप्रकार बंद होतील आणि खरेच ज्यांना गरज आहे, त्यांना तात्काळ मदत करणे पोलिसांना शक्य होईल.
नागरी वस्त्यांमध्ये पोलिसांचा वावर वाढल्यामुळे गुन्हेगारीला अंकूश बसेल. कायदा व सुव्यस्थेची स्थिती अबाधित राहील. पोलिसांची तात्काळ मदत मिळाल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढेल आणि ‘जनता-पोलीस’ यांच्यातील संबंध चांगले होतील.

Web Title: The police force will make 'smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.