पोलिसांना मिळत नाही वारजूकर
By Admin | Updated: September 28, 2016 03:24 IST2016-09-28T03:24:57+5:302016-09-28T03:24:57+5:30
बलात्कार प्रकरणातील आरोपीला धमकी देणारे माजी आमदार अविनाश वारजूकर यांना भंडारा पोलीस दोन दिवसांपासून शोधत आहेत.

पोलिसांना मिळत नाही वारजूकर
घरावर चिटकवली२२२२२ नोटीस : तपास अधिकारीही बदलले
नागपूर : बलात्कार प्रकरणातील आरोपीला धमकी देणारे माजी आमदार अविनाश वारजूकर यांना भंडारा पोलीस दोन दिवसांपासून शोधत आहेत. ते उपलब्ध न झाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या धंतोली ठाण्याच्या हद्दीतील निवासस्थानी नोटीस चिटकवला आहे. वारजूकर यांना बलात्कार प्रकरणात न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. या घडामोडींमुळे वारजूकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वारजूकरांच्या विरोधात भंडारा पोलिसांनी २७ जुलैला बलात्कार आणि पिस्तुलाच्या धाकावर धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला होता. वारजूकरांनी ९ नोव्हेंबर २०१५ च्या सकाळी भंडारा येथील एका हॉटेलमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पीडित महिलेसोबत तिच्या मैत्रिणीचे पती असलेले वर्धमाननगरातील एक व्यापारी होते. त्यामुळे पोलिसांनी या व्यापाऱ्याला या प्रकरणात साक्षीदार बनविले होते. वारजूकरांना या प्रकरणात कोर्टातून सशर्त जामीन मिळाला आहे. भंडारा पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहे. तरीसुद्धा वारजूकरांवर व्यापाऱ्याला धमकावण्याचा आरोप आहे. व्यापाऱ्याच्या तक्रारीनुसार, त्यांना नऊ महिन्यात वारजूकरांनी अनेक कॉल केले. त्यातील १७६ कॉल व्यापाऱ्याने रेकॉर्ड केले, पत्नी आणि मुलीसोबत बरेवाईट करण्याची धमकी मिळाल्याने त्यांनी दोन महिन्यांपूर्वी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर २० सप्टेंबरला पोलिसांनी प्रकरण नोंदवून घेतले.
दरम्यान, साक्षीदाराला धमकावल्या जात असल्याचे पुढे आल्यामुळे भंडारा पोलिसांना जबर हादरा बसला आहे. बलात्कार प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण करीत होते. पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी आता हा तपास उपविभागीय अधिकारी संजय जोगदंड यांच्याकडे सोपवला आहे. भंडारा पोलिसांनी वारजूकरांना चौकशीसाठी बोलविले होते. ते आले नाही. त्यामुळे २४ सप्टेंबरला पोलीस पथक नागपुरात आले. दोन दिवस चौकशी करूनही वारजूकर उपलब्ध न झाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या दाराजवळ नोटीस चिटकवली. त्यात चौकशीसाठी घरी हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती. तरीसुद्धा वारजूकर उपलब्ध झाले नाही. (प्रतिनिधी)
अडचणी वाढण्याची चर्चा
बुधवारी त्यांच्या अंतरिम जामिन याचिकेवर सुनावणी आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे वारजूकरांची अडचण वाढण्याची चर्चा आहे. साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणात लकडगंज पोलिसांचीही धावपळ वाढली आहे. वारजूकरांचा पोलीस ठिकठिकाणी शोध घेत आहेत. एका मोठ्या नेत्याच्या संबंधितांसह काही चर्चित लोकांच्या वारजूकर संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीसही सतर्कतेने शोधमोहिम राबवत आहे. केवळ हेच प्रकरण नव्हे तर वारजूकर यापूर्वीही चर्चेत होते. शासकीय कर्मचारी कर्तव्यावर असताना त्याला मारहाण करणे, तोडफोड करणे, घरावर कब्जा करण्याचे गुन्हेही यापूर्वी दाखल आहेत. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून नागपुरात अनेक वर्षांपासून ते सक्रिय आहेत. येथे त्यांनी विटाभट्टी तसेच मालमत्तेच्या व्यापाराचाही अनुभव घेतला आहे. याचदरम्यान पीडित महिला त्यांच्या संपर्कात आली होती, असे सांगितले जाते.