बलात्काऱ्यांना का पकडत नाहीत पोलीस

By Admin | Updated: December 9, 2015 03:15 IST2015-12-09T03:15:11+5:302015-12-09T03:15:11+5:30

घरात गरीबीच आयुष्य व्यापून उरलेली. त्यामुळे येणारी असहायतादेखील रोजचीच नशिबाला पूजलेली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला.

Police do not catch the rapists | बलात्काऱ्यांना का पकडत नाहीत पोलीस

बलात्काऱ्यांना का पकडत नाहीत पोलीस

नागपूर : घरात गरीबीच आयुष्य व्यापून उरलेली. त्यामुळे येणारी असहायतादेखील रोजचीच नशिबाला पूजलेली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. शिक्षण घेऊन या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आणि एका चांगल्या आयुष्याची स्वप्न रंगविणाऱ्या एका तरुणीच्या स्वप्नांचा गावातीलच काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी चुराडा केला आणि त्या तरुणीचे भावविश्वच कोसळले.
गरिबीचे चटके सोसणाऱ्या एका असहाय तरुणीला काही तरुणांनी सहा दिवस एका खोलीत डांबून ठेवून सातत्याने अत्याचार केला. या तरुणांना धडा शिकविण्यासाठी पीडित तरुणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेता, तिलाच दमदाटी करून पिटाळून लावले. एवढेच नव्हे तर तक्रार दिल्यास पीडित तरुणी आणि तिच्या आईविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यासही पोलीस विसरले नाहीत. हिवाळी अधिवेशनात तरी मायबाप सरकार आपली दखल घेईल, या भावनेने ती नागपुरात पोहचली. परंतु येथेही दिवसभर भटकंती करून तिच्या पदरात निराशाच पडली. स्त्रियांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी तमाम कडक कायदे असतानाही एका युवतीला न्यायासाठी दारोदार भटकावे लागते, यापेक्षा काय शोकांतिका असावी?चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस तालुक्यातील एका गावातील वनमजूर महिलेच्या मुलीसोबत घडलेली ही क्रूर घटना आहे. घरची परिस्थिती हलाखीची असूनही शिक्षणाची आवड असल्यामुळे कशीबशी बारावीला शिकत असलेल्या तरुणीसोबत ही अमानुष घटना घडली आहे. ४ नोव्हेंबरला तिच्याच गावातील गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी घरी एकटी असल्याचे पाहून चाकूच्या धाकावर तिला पळवून नेले.
पोलिसांनीच दिली धमकी
नागपूर : एका मित्राच्या खोलीवर सहा दिवस डांबून ठेवले. सहा दिवसात त्यांनी सातत्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यांच्या तावडीतून शिताफीने सुटका केल्यावर तरुणी घरी पोहचली. आईला तिने आपबिती सांगितली. लगेच तिच्या आईने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. परंतु पोलिसांची भूमिका बघून त्यांना धक्काच बसला. गुन्हा दाखल करायचा सोडून, या मायलेकींनाच खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी पोलिसांनी देऊन पिटाळून लावले. चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांचीही तिने भेट घेतली. परंतु त्यांनीही तिचे समाधान केले नाही.
अद्याप न्याय मिळालाच नाही
कुणीतरी दखल घ्यावी, या भावनेतून ही युवती आपल्या आईसोबत मंगळवारी नागपुरात दाखल झाली. सरकार नागपुरात दाखल झाले आहे. त्यांच्यापर्यंत पोहचून आपल्या वेदना सांगण्यासाठी तिने दिवसभर प्रयत्न केला. लाल गाडीच्या दिव्याजवळ जाण्याचा तिने प्रयत्नही केला. पण सामान्य युवतीचे ऐकून घेण्यासाठी कुणीच वेळ दिला नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून ती धरणे परिसरातही गेली. खाकी वर्दीतले पोलीस न्याय देतील, अशी अपेक्षा होती. पण नाहीच. शेवटी पत्रकार भवनात ती पोहचली. आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचे तिने ठरविले. पत्रकार परिषदेला पैसे लागत असल्याचे तिला समजल्याने ती हतबल झाली. पत्रकार संघाने आणि काही पत्रकारांनी पुढाकार घेऊन तिच्याकडून एकही रुपया न घेता, तिची बाजू पत्रकार परिषदेत ऐकून घेतली. उपाशी असलेली ही मुलगी आणि तिच्या आईची पत्रकारांनी भोजनाची व्यवस्था करून परतीसाठी आर्थिक मदतही केली. तिला न्याय मात्र अद्यापही मिळालेला नाही.

Web Title: Police do not catch the rapists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.