पोलिसांच्या सुरक्षेत कापले वीज कनेक्शन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST2021-03-14T04:07:48+5:302021-03-14T04:07:48+5:30
रविवारी बहुतांश थकबाकीदारांवर होणार कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवारपासून शहरात लॉकडाऊन लागू होत आहे. शनिवार-रविवारीही बाजार व ...

पोलिसांच्या सुरक्षेत कापले वीज कनेक्शन ()
रविवारी बहुतांश थकबाकीदारांवर होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारपासून शहरात लॉकडाऊन लागू होत आहे. शनिवार-रविवारीही बाजार व दुकाने बंद होती. दुसरीकडे महावितरणने थकबाकीदारांविरुद्धची मोहीम आणखी तीव्र केली. पोलिसांच्या संरक्षणात तब्बल ६८३ जणांचे वीज कनेक्शन कापण्यात आले.
लॉकडाऊन दरम्यान कुणाचेही वीज कनेक्शन कापले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे महावितरणकडे आता केवळ रविवारचाच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे उद्या बहुतांश थकबाकीदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शहर सर्कलमध्ये (नागपूर शहर, बुटीबोरी व हिंगणा) या महिन्यात एकूण डिमांड २१४.१८ कोटींची होती, तर २५२.३५ कोटींची वसुली झाली. परंतु, त्यानंतरही १७२.९७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा परिस्थितीत कंपनीने लॉकडाऊनपूर्वी जास्तीतजास्त वसुली करण्याची तयारी केली आहे. आज शनिवारी पोलीस संरक्षणात बिनाकी, भालदारपुरा परिसरातील थकबाकीदारांची वीज कापण्यात आली.
बॉक्स
अनेक ठिकाणी तणाव
महावितरणच्या या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. बंदच्या दिवशीही कारवाई होत असल्यामुळे लोक संतप्त आहेत. गुजरवाडीमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईचा विरोधही केला.