पोलिसांची भागमभाग
By Admin | Updated: July 22, 2015 03:27 IST2015-07-22T03:27:37+5:302015-07-22T03:27:37+5:30
वाहतूक नियम तोडले : केवळ पत्रकारांना टाळण्यासाठी

पोलिसांची भागमभाग
नागपूर : शहर पोलीस दलाच्या एका पथकाने मंगळवारी दुपारी उपराजधानीतील रस्त्यावर भरधाव वाहन दामटत अर्ध्या तासात ३ ते ४ सिग्नल तोडले. हे करताना पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचीच नव्हे तर कायद्याचीही वाट लावली. याकूब मेमनचा भाऊ आणि त्याचे वकील या दोघांना कोणताही धोका नसताना केवळ प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी ही धोकादायक भागदौड केली.
मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकूब मेमनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनवर मंगळवारी सुनावणी होणार होती. या पार्श्वभूमीवर, त्याचे दिल्लीतील वकील अॅड. शुबेल फारुख मंगळवारी नागपुरात पोहचले. याकूबचा चुलत भाऊ उस्मान मेमन याच्यासोबत ते सकाळी कारागृहात गेले. दीड ते दोन तास चर्चा केल्यानंतर दुपारी १२ वाजता अॅड. फारुख आणि उस्मान कारागृहातून पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून बाहेर आले. कारागृह परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी असल्याचे पाहून त्यांना टाळण्यासाठी पोलिसांनी आपले वाहन सिनेस्टाईल वर्धा रोडने दामटले. काही पत्रकार वाहनाच्या मागे असल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी सर्वप्रथम अजनीतील सिग्नल तोडला. त्यानंतर साई मंदिर चौकाकडून पोलीस नरेंद्रनगरचा सिग्नल तोडत शताब्दी चौकात, तेथून रामेश्वरी, अजनी पोलीस ठाणे, तुकडोजी चौक, मेडिकल चौक, राजाबाक्षा या मार्गाने भरधाव वाहन दौडवत मेडिकलच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तेथे अॅड. फारुख आणि उस्मान यांना घेण्यासाठी एक कार उभी होती.
पोलिसांच्या वाहनातून उतरताच अॅड. फारुख आणि उस्मान यांना पोलिसांनी कारमध्ये बसविण्याचे प्रयत्न केले.
मात्र, २० मिनिटांपासून जीव धोक्यात घालून कर्तव्यासाठी धावपळ करणाऱ्या पत्रकारांची भावना लक्षात घेत अॅड. फारुख यांनी त्यांच्याशी संक्षिप्त चर्चा केली. (प्रतिनिधी)