वीणा बजाज यांना पोलीस कोठडी रिमांड
By Admin | Updated: October 8, 2015 02:30 IST2015-10-08T02:30:34+5:302015-10-08T02:30:34+5:30
भ्रष्टाचाराच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटका येथील ओंकारलाल सिंधू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वीणा दीपक बजाज यांना .....

वीणा बजाज यांना पोलीस कोठडी रिमांड
न्यायालय : अपसंपदा प्रकरण
नागपूर : भ्रष्टाचाराच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटका येथील ओंकारलाल सिंधू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वीणा दीपक बजाज यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. मंगळवारी वीणा बजाज यांना अटक करण्यात आली होती.
जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाज यांच्या निवासस्थानी, सोसायटी कार्यालय आणि परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ सप्टेंबर रोजी धाड घालून १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख जप्त केले होते. या शिवाय पथकाला २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किंमतीचे घरगुती सामान आढळले होते. पथकाला एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळून आली होती. सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती.
बजाज यांच्याविरुद्ध २६ सप्टेंबर रोजी जरीपटका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई)(ड), १३ (२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशी करीत असता पथकाला वीणा बजाज यांच्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी आणि पुरावे आढळून येताच त्यांना अटक करण्यात आली.
दीपक बजाज यांना सचिव या नात्याने शाळेत शिक्षकांची नेमणूक करण्याचे अधिकार असताना त्यांनी प्रतीक घोडे नावाच्या चित्रकला शिक्षकाची नेमणूक करण्याचे अधिकार आपली पत्नी वीणा बजाज यांना दिले होते. वीणा बजाज यांनी एकटीने ५ नोव्हेंबर २०१४ रोजी घोडे यांची मुलाखत घेतली होती. वीणा यांनी प्रतीक घोडेला १० लाखांची मागणी केली होती. त्यापैकी तीन लाख रुपये आधी घेतले होते. कोऱ्या स्टॅम्पपेपरवर घोडे याची सहीही घेतली होती. घोडे हा वारंवार मागणी करूनही सात लाख रुपये देत नसल्याने त्याला राजीनामा देण्यासाठी वारंवार धमक्या देऊन मानसिक त्रास देण्यात आला होता. पुढे तो पैसे देऊ न शकल्याने त्याला १० महिन्यांतच कामावरून काढून टाकण्यात आले होते.
धाडीच्या कारवाईत पथकाला कोऱ्या स्टॅम्पपेपरवर तीन शिक्षकांच्या सह्या आढळल्या होत्या. मिती बच्चर, हरजित होडा यांनाही त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे न दिल्याने कामावरून काढून टाकले होते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शुल्कातही मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आला आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)