आरोपीस २३ पर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Updated: November 19, 2015 03:46 IST2015-11-19T03:46:21+5:302015-11-19T03:46:21+5:30
हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव (वागदरा) नजीकच्या वृंदावन सिटी प्रवेशद्वारासमोर मंगळवारी ...

आरोपीस २३ पर्यंत पोलीस कोठडी
हिंगणा तिहेरी हत्याकांड : सहआरोपी फरार
हिंगणा : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव (वागदरा) नजीकच्या वृंदावन सिटी प्रवेशद्वारासमोर मंगळवारी एका अट्टल गुन्हेगाराने तिघांची निर्घृण हत्या केली. या तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या राजू शन्नू बिरहा याची २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी हिंगणा पोलिसांनी मिळवली आहे. या हत्याकांडातील सहआरोपी असलेला कमलेश हा मात्र अद्यापही पोलिसांना गवसला नाही.
पानटपरी लावण्याच्या वादातून आरोपी राजू शन्नू बिरहा (४५, रा. गुमगाव, ता. हिंगणा) याने धारदार कोयत्याने वार करुन बाजूचा पानटपरी चालक सुनील हेमराज कोटांगळे आणि त्याच्या मदतीला आलेल्या दोघांची हत्या केली. सर्वत्र दहशत निर्माण करणारे हे हत्याकांड मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडले. मृत सुनील कोटांगळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला तर कैलास नारायण बहादुरे आणि आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड या दोघांचे मृतदेह आज बुधवारी मेडिकल रुग्णालयात शवविच्छेदनानंतर प्राप्त झाले. कैलास आणि आशिष यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी राजू बिरहा यास मदत करणारा सहआरोपी कमलेश हा फरार असून हिंगणा पोलीस त्याच्या शोध घेण्यासाठी परिसर पिंजून काढत आहेत.
समाजमन हेलवणाऱ्या थरारक हत्याकांडातील मृत व आरोपीच्या मुला-मुलींच्या भविष्याचा प्रश्न मात्र परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)