लग्नाऐवजी पोलिसांची बेडी
By Admin | Updated: April 9, 2017 02:13 IST2017-04-09T02:13:35+5:302017-04-09T02:13:35+5:30
लग्न पक्के झाल्यामुळे भावी पत्नीसोबत लग्नापूर्वीच शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध ....

लग्नाऐवजी पोलिसांची बेडी
तरुणावर बलात्काराचा आरोप : आई आणि मामावरही हुंड्याचा आरोप
नागपूर : लग्न पक्के झाल्यामुळे भावी पत्नीसोबत लग्नापूर्वीच शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एक लाखाच्या हुंड्यासाठी लग्न मोडले म्हणून तरुणाच्या आई आणि मामावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लग्नबेडीऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकलेल्या या आरोपीचे नाव अनिकेत अशोक कांबळे (वय ३०) आहे. तो मानेवाड्यातील चिंतामणीनगरात राहतो. एका शाळेत काम करणाऱ्या अनिकेतचा लग्न जुळविणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून जरीपटक्यातील फिर्यादी तरुणीसोबत (वय २५) संपर्क आला.
तरुणीची घरची स्थिती गरिबीची आहे. त्यांची सगाई झाली. दोन्ही पक्षाकडून १७ एप्रिलला लग्न करण्यावर एकमत झाले. दरम्यान, २८ फेब्रुवारीला रात्री अनितकेत तरुणीच्या घरी पोहचला. त्यांच्यात त्यावेळी शारीरिक संबंध आले. त्यानंतर २ एप्रिलला मध्यरात्री पुन्हा अनिकेतने तरुणीच्या घरी जाऊन तिच्यासोबत शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्यामुळे तिच्या गालावर थापड मारून लग्न मोडण्याची धमकी दिली. दरम्यान, १७ एप्रिलला लग्नाची दोन्हीकडून तयारी सुरू होती. शुक्रवारी अचानक तरुणीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. अनिकेतने दोनवेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि आता लग्नास नकार देतो, असे तक्रारीत नमूद केले. त्याचप्रमाणे त्याची आई आणि मामा या दोघांनी आपल्या नातेवाईकांना घरी बोलवून एक लाखाच्या हुंड्याची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी लग्नास नकार दिला, असेही तक्रारीत नमूद केले. त्यावरून जरीपटक्याचे सहायक पोलीस निरीक्षक आय. एस. हनवते यांनी अनिकेतविरुद्ध बलात्कार तसेच त्याच्या आई आणि मामाविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
गैरसमज अन् वाद !
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हा सर्व वाद गैरसमजातून निर्माण झाल्याचे पुढे आले आहे. अनिकेतच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांचा औषधोपचार सुरू आहे. त्यांच्या औषधोपचाराचा खर्च वाढल्यामुळे आपण विवाह समारंभ काही दिवस पुढे ढकलू, अशी भूमिका अनिकेतच्या कुटुंबीयांनी घेतली. त्यातून वादाला सुरुवात झाली. लग्नासाठी ते टाळाटाळ करीत आहेत, असा गैरसमज झाल्यामुळे तरुणीने तक्रार नोंदवली. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्याचे जरीपटका पोलीस सांगत आहेत.(प्रतिनिधी)