पोलीस हवालदाराला मारहाण
By Admin | Updated: November 22, 2014 02:26 IST2014-11-22T02:26:47+5:302014-11-22T02:26:47+5:30
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या एका पोलीस हवालदाराला दोघांनी मारहाण केली.

पोलीस हवालदाराला मारहाण
नागपूर : बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या एका पोलीस हवालदाराला दोघांनी मारहाण केली. महेंद्र शत्रुघ्न त्रिपाठी (वय १९) आणि संतोष शत्रुघ्न त्रिपाठी (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत. ते भरतवाडा, गुलमोहरनगर चौकाजवळ राहतात.
बुधवारी सायंकाळी कळमन्यातील मिनी मातानगरात मेहता धर्मकाट्याजवळ भरधाव ट्रकने एका शाळकरी मुलाला चिरडले. यामुळे संतप्त जमावाने गुरुवारी सकाळी या धर्मकाट्याजवळ जोरदार आंदोलन केले. यावेळी या भागातील बेशिस्त वाहनचालकांना वळण लावण्यासाठी वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी जमावाने केली. त्यानुसार तेथे पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. इंदोरा, वाहतूक शाखेचे हवलदार संजय रामटेके आज दुपारी आपल्या कर्तव्यावर असताना त्यांना एमएच ३१/ सीव्ही ६०९८ चा टॅ्रक्टरचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसला. त्यामुळे रामटेके यांनी त्या ट्रॅक्टरचालकाला थांबवून त्याच्यावर चालान कारवाई केली. त्यामुळे संतप्त झालेल्या महेंद्र आणि संतोषने रामटेकेंना अश्लिल शिवीगाळ केली. त्यांच्या हातातील चालान पावती फाडून आरोपींनी रामटेकेंना मारहाण केली.
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकाराची माहिती देऊन रामटेके यांच्या सहकाऱ्यांनी माहिती देऊन घटनास्थळी पोलीस ताफा बोलवून घेतला. त्यांनी त्रिपाठी बंधूंना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले.
ठाण्यातही आरोपींनी गोंधळ घातला. पाहून घेण्याची धमकी दिली. पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली.(प्रतिनिधी)