पोलीस ठाण्यातून पळालेल्या आरोपीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:07+5:302021-05-09T04:10:07+5:30

- दोन दिवस सलग परिश्रम - अखेर क्लू मिळाला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यातून पळ काढणाऱ्या ...

Police arrested the accused who fled the police station | पोलीस ठाण्यातून पळालेल्या आरोपीला पकडले

पोलीस ठाण्यातून पळालेल्या आरोपीला पकडले

Next

- दोन दिवस सलग परिश्रम

- अखेर क्लू मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यातून पळ काढणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी शोधून काढले. विशेष म्हणजे, तो पळून गेल्यामुळे ज्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते, त्याच पोलीस उपनिरीक्षकांनी दोन दिवस सलग परिश्रम घेतल्यानंतर अखेर शनिवारी त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले.

उबेद रजा इकराम उल हक असे आरोपीचे नाव आहे. उबेद पाचपावलीतील अपोलो मेडिकल स्टोअर्सचा संचालक आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांनी सापळा रचून रविवारी (दि. २) उबेदला रंगेहात पकडले होते. तो पाचपावली पोलिसांच्या कोठडीत होता. मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात गर्दी झाल्याचे पाहून उबेदने ठाण्यातून पळ काढला. या प्रकरणाची पोलीस आयुक्तांनी उपायुक्तांकडून चौकशी करून घेतली. आरोपी पळून जाण्यास पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत गोडबोले यांना गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले. ज्या आरोपीला आपण सापळा रचून पकडले, तोच आरोपी आपल्या दुर्लक्षितपणामुळे पळून गेल्याने नोकरीवर गदा आल्यामुळे गोडबोले गेल्या दोन दिवसांपासून झोपलेच नाहीत. ते पोलीस ठाण्यात राहूनच आरोपीचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करू लागले. अखेर शनिवारी दुपारी त्यांना क्लू मिळाला. त्याआधारे गोडबोले आपल्या सहकाऱ्यांसह यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उप्पलवाडीतील झुडपी भागात पोहोचले. तेथे दडून असलेल्या आरोपी उबेद रजा याच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सायंकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे.

----

कारवाईबद्दल विचार

ज्या चुकीमुळे गोडबोले यांना निलंबित करण्यात आले त्या आरोपीला पकडून गोडबोले यांनी ती चूक दुरुस्त केली. त्यामुळे त्यांच्या निलंबनाच्या कारवाईबाबत सहानुभूतिपूर्वक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

.......................

Web Title: Police arrested the accused who fled the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app