सीपींचे पोलिसांना ‘सरप्राईज गिफ्ट’

By Admin | Updated: October 14, 2016 03:17 IST2016-10-14T03:17:59+5:302016-10-14T03:17:59+5:30

पोलीस आणि तणाव हे दोन्ही शब्द एकच वाटावे, इतके ते एकरूप झाले आहे. रोजच्या गुन्हेगारी घटना, वर्षभर चालणारे सण-उत्सव या सर्वातून आनंदाचे चार क्षण

Police arrest 'Surprise Gift' | सीपींचे पोलिसांना ‘सरप्राईज गिफ्ट’

सीपींचे पोलिसांना ‘सरप्राईज गिफ्ट’

दडपणावर ‘फिल्मी’ आवरण : बंदोबस्ताच्या नावावर चित्रपटगृहात नेले
नरेश डोंगरे नागपूर
पोलीस आणि तणाव हे दोन्ही शब्द एकच वाटावे, इतके ते एकरूप झाले आहे. रोजच्या गुन्हेगारी घटना, वर्षभर चालणारे सण-उत्सव या सर्वातून आनंदाचे चार क्षण मिळवणे पोलिसांच्या दृष्टीने महाकठीण काम. त्यातही या आनंदाच्या चार क्षणांची चिंता कर्तव्य कठोर अधिकारी घेतील, असा विचार तर पोलीस स्वप्नातही करू शकत नाहीत. परंतु हे न कल्पिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले. लागोपाठ दीड महिन्यांपासून बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांना पोलीस आयुक्तांनी असे ‘पिंक गिफ्ट’ दिले की ते स्वीकारणारा कोणताही पोलीस आयुष्यभर ही सुंदर आठवण कधीही विसरणार नाही.

लागोपाठ दीड महिन्यांपासून बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांनी बुधवारी दुपारी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता पुढचे चार दोन दिवस आरामात काढू, असे अनेकांनी मनोमन स्वप्नही रंगवले. मात्र, कसले काय. ‘गुरुवारी प्रत्येक झोनमधून ५० जणांचे (अधिकारी-कर्मचारी) मनुष्यबळ बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालयात पाठवा’, असे आदेश प्रत्येक परिमंडळात अन् तेथून पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी धडकले. त्यामुळे अनेकांचा रक्तदाब वाढला. नोकरीवर गंडांतर येऊ नये, केवळ याच एका कारणामुळे ज्यांना बंदोबस्ताच्या नावाखाली पाठविण्यात आले ते पोलीस अधिकारी, कर्मचारी गुरुवारी मुख्यालयात पोहचले. मात्र त्यांना येथे एक सुखद धक्का बसला. गणेशोत्सव, दुर्गाउत्सव, विजयादशमी, मोहरम आणि दीक्षाभूमीवरील सोहळ्याच्या या बंदोबस्ताने अवघ्या पोलीस दलाचा ताण वाढला होता. दीक्षाभूमीवरील सोहळ्याची मंगळवारी रात्री सांगता झाली. बुधवारी सकाळी देशाच्या विविध प्रांतातून आलेले बौद्ध बांधव सुखरूप नागपुरातून परत निघाले अन् कुठलीही गडबड झाली नाही, याचे समाधान मानत तसेच संपला एकदाचा बंदोबस्त अशी कल्पना रंगवत पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, कसले काय. वरिष्ठांकडून बुधवारी लगेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आदेश मिळाले. तुमच्या झोनमधून किमान ५० कर्मचारी (त्यात काही अधिकारीसुद्धा !) गुरुवारी बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालयात पाठवा, असे आदेश होते. त्यामुळे आपसूकच अनेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या. मात्र, पोलीस म्हणजे शिस्तीचे दल. उजर करायचा नाही, बोलायचे नाही, हा दंडक असल्याने कुणी काही बोलायचे कारण नव्हते. त्यामुळे प्रचंड दडपण सोबत घेऊन सर्वच पोलीस ठाणी, गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि अन्य शाखांमधून प्रत्येकी पाच ते दहा जणांचे मनुष्यबळ गुरुवारी सकाळी ११.३० वाजता मुख्यालयात पोहचले. आता कोणत्या ठिकाणी बंदोबस्तावर पाठविणार, असा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत होता. सध्या नाशिकमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यभरातील पोलीस दलातून अतिरिक्त मनुष्यबळ बंदोबस्ताला पाठविले जात आहे. अनेकांना त्याची कल्पना असल्यामुळे आपल्यालाही आता नाशिकलाच पाठविले जाणार, असे बहुतांश जणांना वाटू लागले. दरम्यान, १ ते १.१५ च्या दरम्यान, कागदोपत्री औपचारिकता पार पडल्यानंतर पोलीस व्हॅनमध्ये अधिकारी, कर्मचारी असे ३२५ जण बसविण्यात आले.

आयुक्त, सहआयुक्तांची एन्ट्री
पुढच्या काही मिनिटात ही मंडळी सिनेमॅक्सच्या आतमध्ये होती. एव्हाना दुपारचे १.४५ वाजले होते. अमिताभ बच्चनचा ‘ पिंक‘ हा चित्रपट सुरू झाला. दरम्यान, ईशू सिंधू वगळता (सुटीवर असल्यामुळे) उर्वरित बहुतांश पोलीस उपायुक्तही चित्रपटगृहात पोहचले होते. त्यामुळे बंदोबस्तावर निघालेले पोलीस चांगलेच बुचकळ्यात पडले. त्यांना काही कळेना. चित्रपट संपला. तत्पूर्वी मध्यंतरात पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि सहआयुक्त संतोष रस्तोगी चित्रपटगृहात पोहचले. संभ्रमात असलेल्या पोलिसांना त्यांनी ‘कैसा लगा बंदोबस्त’, असा प्रश्न केला. ‘फील गूड सर’, अशीच प्रतिक्रिया मिळाली.

चित्रपट प्रशिक्षणाचे काम करून जातो
नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पडलेल्या या फिल्मी बंदोबस्तामागे काय कल्पना आहे, ते जाणून घेण्यासाठी सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांच्याशी लोकमतने संपर्क साधला. ते म्हणाले, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या पोलीस वेल्फेअरच्या अनेक कल्पना आहेत. ‘‘काही काही चित्रपट प्रशिक्षणाचे काम करून जातात. एक वेगळा प्रयोग म्हणून त्याचा उपयोग होतो. आयुक्तांच्या कल्पनेचीच जोड आजच्या उपक्रमाच्या आयोजनामागे होती, असेही सहआयुक्त रस्तोगी म्हणाले.

Web Title: Police arrest 'Surprise Gift'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.