पोलीस-नक्षल चकमकीत जवान जखमी

By Admin | Updated: December 7, 2014 00:24 IST2014-12-07T00:24:28+5:302014-12-07T00:24:28+5:30

गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्याच्या कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नाडेकलच्या जंगलात शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांसोबत चकमक होऊन पोलीस जवान जखमी झाला.

Police and Naxal encounter personnel injured | पोलीस-नक्षल चकमकीत जवान जखमी

पोलीस-नक्षल चकमकीत जवान जखमी

पायातून गोळी आरपार : नागपूर येथे उपचार
कुरखेडा (जि.गडचिरोली)/नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्याच्या कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नाडेकलच्या जंगलात शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांसोबत चकमक होऊन पोलीस जवान जखमी झाला. जबर जखमी झालेल्या दुधराम चरणदास चावरे (२५) या जवानावर नागपूर येथील आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी त्याला हेलिकॉप्टरने गडचिरोलीहून नागपुरात आणण्यात आले.
छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या नाडेकलच्या जंगलात शनिवारच्या पहाटे सुरक्षा दल (सी-६० पोलीस पथक) आणि सशस्त्र नक्षलवाद्यात जोरदार चकमक झाली. नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना चावरे याच्या डाव्या पायाच्या पोटरीला (गुडघ्याखालील भाग) गोळी लागली. त्यामुळे चावरे जबर जखमी झाले. सकाळी ८.३० वाजता त्यांना गडचिरोलीत आणि नंतर तेथून हेलिकॉप्टरने नागपुरात आणण्यात आले.
पूर्वकल्पना असल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी विमानतळावर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करून ठेवली होती. चावरे यांना आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. चावरेच्या पोटरीतून बंदुकीची गोळी आरपार गेल्याचे पाहून इस्पितळाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तुषार भुरे यांच्या नेतृत्वात डॉ. रोहित गुप्ता, डॉ. निनाद गावंडे या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर चावरे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या प्रकृतीवर इस्पितळाचे संचालक डॉ. अनुप मरार आणि डॉक्टरांची चमू विशेष लक्ष ठेवून आहे. चावरे यांच्यासोबत विशाल मरकाम हा जवान आहे. या चकमकीमुळे नक्षलवाद्यांचा आणखी जोमाने मुकाबला करण्याचे बळ मिळाल्याचे विशालने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचेही विशालने सांगितले.

Web Title: Police and Naxal encounter personnel injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.