लेडी चिटरच्या किस्स्यांमुळे पोलीसही चक्रावले
By Admin | Updated: October 24, 2016 02:53 IST2016-10-24T02:53:40+5:302016-10-24T02:53:40+5:30
लेडी चिटर पूजा ठक्कर ऊर्फ पूजा खान हिच्या चौकशीतून पुढे आलेल्या किस्स्यांमुळे येथील पोलीस अधिकारी चक्रावले आहेत.

लेडी चिटरच्या किस्स्यांमुळे पोलीसही चक्रावले
मुंबई, मसुरीतही फसवणूक : सारे काही ऐषोआरामासाठी
नागपूर : लेडी चिटर पूजा ठक्कर ऊर्फ पूजा खान हिच्या चौकशीतून पुढे आलेल्या किस्स्यांमुळे येथील पोलीस अधिकारी चक्रावले आहेत. स्वत:ला जज, आयपीएस, आयएएस अधिकारी सांगून ती विविध महानगरात राहून ऐशोआरामाचे जीवन व्यतीत करीत असल्याचे उघड झाले. तिच्या या सवयीमुळे तिच्यावर मुंबई आणि मसुरीत गुन्हेही दाखल असल्याचे पोलीस सांगत आहे.
मूळची पुण्यातील रहिवासी असलेल्या पूजाने अनेक दिवसांपासून ठाण मांडून हॉटेल सेंटर पॉर्इंट प्रशासनाच्या नाकीनऊ आणले होते. ती बिल देण्याचे आणि हॉटेल सोडण्याचे नाव घेत नसल्याने हॉटेल प्रशासनाने तिची सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने स्वत:ला आधी आयएएस आणि नंतर आयपीएस अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे सांगितले. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर असलेले पूजाचे प्रभुत्व आणि तिची बोलण्याची शैली पोलिसांवर दडपण आणणारी ठरली. आपण अमेरिकेतील हॉवर्ड युनिव्हर्सिटीची पदवीधारक आहोत. आपला भाऊ यूएसमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असून, आपल्या मागेपुढे आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे भक्कम पाठबळ आहे. तुम्ही कारवाई केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी पूजाने दिल्यामुळे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत तिची सावधगिरीने माहिती काढणे सुरू केले.(प्रतिनिधी)
फेसबुकवरून पोलखोल
तिच्या फेसबुकवर असलेल्या माहितीवरून ती खोटी बोलत असल्याचे स्पष्ट झाले. तिने मुंबईला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे तर उत्तराखंड मसुरीला प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांसाठी असलेल्या अतिथीगृहात मुक्काम ठोकल्याचे आणि त्यामुळे तेथेही तिच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच पोलिसांनी तिची धिटाईने चौकशी सुरू केली.
असा झाला भंडाफोड
तिने ए. ए. खान (वय ७५) या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यासोबत जुलै २०१६ मध्ये लग्न केल्याचे पोलिसांना सांगितले. हे सांगतानाच स्वत:चे वय ५७ वर्षे सांगितले.तिचे पॅनकार्ड तपासले असता त्यावर तिचे वय २७ वर्षे होते. ही एकूणच विसंगत माहिती पुढे आल्यानंतर तिने पुण्याहून आणलेल्या टॅक्सीचालकाची पोलिसांनी चौकशी केली अन् खुद्द पोलीसही चक्रावले. पूजाने त्या टॅक्सीचालकाला अन् हॉटेलमध्ये सलून चालविणाऱ्या एका महिलेलाही चुना लावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तिला शुक्रवारी अटक केली. तिला आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने तिची व्यक्तीगत जात मुचलक्यावर सुटका केली.