कविताची आत्महत्या वैफल्यग्रस्ततेतून
By Admin | Updated: June 25, 2017 01:52 IST2017-06-25T01:52:05+5:302017-06-25T01:52:05+5:30
विवाहित तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये राहणाऱ्या कविता ऊर्फ पिंकी आर्यन प्रसाद मिश्रा

कविताची आत्महत्या वैफल्यग्रस्ततेतून
‘लिव्ह इन रिलेशन’ची दुर्दैवी अखेर : प्रियकरावर गुन्हा दाखल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहित तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये राहणाऱ्या कविता ऊर्फ पिंकी आर्यन प्रसाद मिश्रा (वय ३१) हिने वैफल्यग्रस्त झाल्यामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता पोलीस कविताच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करणार असल्याचे संकेत आहेत.
शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास फ्रेण्डस कॉलनीतील स्वागत अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कविताचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता.
इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या कविता ठाकूर आणि आर्यन मिश्राचे दहा वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. दरम्यान, दोघांनी तेथील काम सोडले. कविता एका आॅटोमोबाईल्स कंपनीत काम करू लागली. आर्यनही दुसरी नोकरी करू लागला.
इकडे आर्यनने स्वागत कॉलनीत सदनिका घेतली आणि कवितासोबत तो ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये राहू लागला. दरम्यान, आर्यनने यापूर्वीच लग्न केले अन् त्याला मुलगीही आहे, हे कळाल्याने कविता कमालीची अस्वस्थ झाली. त्या अवस्थेत तिची नोकरीही गेली. घरच्यांनी तिच्या लग्नाची तयारी केली. मात्र, तिने आर्यनला सर्वस्व मानल्याने लग्नास नकार देऊन ती आर्यनसोबतच राहत होती.
याच कारणामुळे सहा महिन्यांपासून तिने घरच्यांसोबत संपर्कही कमी केला.
डोक्याला दुखापत अन् संशय
तिचा मोबाईल नो रिस्पॉन्स असल्यामुळे आर्यन सदनिकेत पोहचला. त्याला कविता गळफास लावलेल्या अवस्थेत दिसल्याने त्याने तिला गडबडीत खाली उतरवले. त्यामुळे खाली पडून कविताच्या डोक्याला दुखापत झाली. त्या अवस्थेत आर्यनने प्रारंभी तिला खासगी रुग्णालयात नेले. तेथून नंतर मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी कविताला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचे वृत्त कळताच तिचे कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी आर्यनवर आरोप लावून कविताच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. प्रकरणाची माहिती कळताच गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी डॉक्टरांना तातडीने शवविच्छेदन अहवाल मागितला. डॉक्टरांनी प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेत कविताने गळफास लावून घेतल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. त्यामुळे घातपाताचा संशय दूर झाला. मात्र, आर्यनच्या दुहेरी भूमिकेमुळे कविता आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी लावला आहे. आर्यनच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या मेसेजमधूनही ते अधोरेखित झाले आहे. त्यामुळे आर्यन मिश्रावर कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसे संकेत गिट्टीखदान पोलिसांकडून मिळाले आहे.