खिसा भरलेला;ओंजळ रिकामी!
By Admin | Updated: November 10, 2016 02:47 IST2016-11-10T02:47:14+5:302016-11-10T02:47:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याबरोबर मंगळवारी रात्रीच शहरातील ‘एटीएम’मधून १०० च्या नोटांचा सफाया झाला होता.

खिसा भरलेला;ओंजळ रिकामी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याबरोबर मंगळवारी रात्रीच शहरातील ‘एटीएम’मधून १०० च्या नोटांचा सफाया झाला होता. बुधवारी ‘एटीएम’ बंद असल्यामुळे सुट्या पैशांसाठी ‘भागम्भाग’ सुरू होती. नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण झाल्या. काहींनी पेट्रोलपंप, औषधांची दुकाने येथे जाऊन ५०० ची नोट चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुटे पैशांचा दुष्काळच पडला असल्याने अनेक दुकानदारांनी ५०० ची खरेदी करायची असेल तरच माल देण्याची तयारी दाखविली. सकाळच्या सुमारास तर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी नागरिक व दुकानदारांमध्ये बाचाबाची झाली.
सोन्याचे दर उघडलेच नाहीत
देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर बुधवारी सोना चांदी ओळ कमेटीने सराफा बाजारात सोन्याचे भाव सकाळी उघडलेच नाहीत आणि सायंकाळी बंद केले नाहीत. पण सोन्याच्या भावाने कृत्रिमरीत्या उसळी घेतली आणि व्यापाऱ्यांनी मनमानी भावाने सोन्याची विक्री केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोन्याच्या दरात होणारा चढउतार पाहता अनेकांनी खरेदीचा बेत रद्द केला. काही दुकानात धनादेश आणि क्रेडिट कार्डद्वारेच सौदे झाले. यामध्ये दागिन्यांऐवजी सोन्याचे बिस्किट अर्थात प्रीमियम गोल्डला ग्राहकांनी प्राधान्य दिले. सोना चांदी ओळ कमिटीचे अध्यक्ष रविकांत हरडे आणि सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले की, सराफा बाजारात दिवसभर चर्चेला उधाण आले होते. ग्राहकांकडून रोख स्वीकारण्यावर संभ्रम होता. अशा स्थितीत अनेकांनी रोखीऐवजी धनादेश, क्रेडिट कार्डच्या व्यवहाराला पसंती दिली. बुधवारी लोकांनीही काळ्या पैशांनी जास्त भावात सोन्याची खरेदी केली. बाजारात कोट्यवधींची अशी उलाढाल क्वचितच होत असते. सकाळी खुलत्या बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा मंगळवारच्या ३०,८५० रुपयांच्या तुलनेत अचानक ३५ हजारांवर पोहोचले. ग्राहकांची मागणी पाहता सराफांनी आपापल्या पद्धतीने सोन्याचे दर निश्चित करून ३६ हजार आणि ३८ हजारांवर नेले. काहींनी प्रतितोळा ४२ हजार रुपये दराने सोन्याचे बिस्किट विकल्याचे सूत्रांनी सांगितले. सराफा व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने दर वाढविल्याचे दिसून आले.
‘कार्ड’चा वापर वाढला
खिशात सुटे पैसे नसलेल्या अनेक नागरिकांनी बुधवारी ‘प्लॅस्टिकमनी’च्या वापरावर भर दिला. मॉल्स, पेट्रोलपंप इत्यादी ठिकाणी ‘एटीएम कार्ड व ‘क्रेडीट कार्ड’द्वारे खरेदी होत होती. काहींनी तर ‘ई कॉमर्स’चा उपयोग करुन खरेदी करण्यास सुरुवात केली.
७५ टक्के व्यवसाय प्रभावित
बुधवारी सर्वत्र ५०० आणि १००० रुपयांचे नोट बंद केल्याची चर्चा होती. व्यावसायिक केवळ नफा-तोट्याची आकडेवारी करण्यात गुंग होते. घाऊक बाजारात थोडेफार व्यवहार झाले तर वाहतूक कंपन्यांमध्ये ट्रकमधून मालाची चढउतार सुरू होती. इतवारी बाजारात सोन्याला मागणी होती. पण रोख आणल्यामुळे ग्राहकांना खरेदीविना परतावे लागले त्यामुळे ७५ टक्के व्यवहार ठप्प झाले. दुसरीकडे होलसेल क्लॉथ मार्केटमध्ये तुरळक ग्राहक दिसून आले.
मोबाईलची विक्री जोरात
घरात काळा पैसा साठविणाऱ्यांनी बुधवारी मोबाईल मार्केटकडेदेखील मोर्चा वळविला. अनेक तरुण खिशात लाखो रुपये घेऊन मोबाईलच्या दुकानांमध्ये पोहोचले. अनेकांनी एका वेळी १ ते दीड लाखांच्या मोबाईलची खरेदी केली असल्याची माहिती सिताबर्डीतील एका दुकानमालकाने दिली. मोबाईलच्या दुकानांतून यावेळी सर्वांना पक्के बिल देण्याची खबरदारी घेण्यात आली.
पेट्रोल पंपावर गोंधळ
केंद्राने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याचा परिणाम बुधवारी पेट्रोल पंपावर दिसून आला. जेवढ्याची नोट द्याल, तेवढ्याच रुपयाचे पेट्रोल वा डिझेल भरावे लागेल, असे बोर्ड काही पंपांवर झळकल्याने गोंधळ उडाला.पेट्रोल पंपावर ५०० आणि १००० रुपयांचे जुने नोट स्वीकारले जातील, अशी घोषणा केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी केली, पण आदेशाची पायमल्ली करीत पंपचालकांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली.
एटीएमबाहेर ‘बंद’चे बोर्ड
केंद्र शासनाच्या घोषणेनुसार बँकांचे एटीएम ९ आणि १० नोव्हेंबरला बंद राहणार आहेत. त्यानंतरही अनेकांनी उत्सुकतेपोटी एटीएमला भेट दिली. पण एटीएमबाहेर लावलेला ‘बंद’चा बोर्ड पाहून त्यांना निराश होऊन परतावे लागले. ग्राहकांच्या सोईसाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएम बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आता एटीएममध्ये ५०, १०० रुपयांच्या मुबलक नोटांसह नवीन ५०० रु. आणि २००० रुपयाच्या नोटा उपलब्ध राहणार आहे. प्रारंभी दोन हजार रुपये काढता येईल. त्यानंतर सोईनुसार ही मर्यादा चार हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी प्रारंभीची सोय केली आहे. त्यानंतर एटीएमचे व्यवहार नियमित होणार आहे. ग्राहकांनी ‘पॅनिक’ न होता शांततेने व्यवहार करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
आज बँकांमध्ये कडेकोट बंदोबस्त
दरम्यान, गुरुवारी बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी निश्चितपणे होणार आहे. यावेळी वादावादी होऊन तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनीसुद्धा कंबर कसली आहे. बँकांमध्ये पोलीस बंदोबस्त राहणार असून नियमित गस्तदेखील वाढविण्यात येणार आहे.