बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकॉकल लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:09 IST2021-07-14T04:09:48+5:302021-07-14T04:09:48+5:30

फुटाळा नागरी केंद्रात शुभारंभ : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बालकांमध्ये होणारे न्यूमोकॉकल आजार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याच्या ...

Pneumococcal vaccination to prevent infant mortality | बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकॉकल लसीकरण

बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकॉकल लसीकरण

फुटाळा नागरी केंद्रात शुभारंभ :

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बालकांमध्ये होणारे न्यूमोकॉकल आजार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याच्या दृष्टीने नागपूर शहरात बालकांच्या न्यूमोकॉकल कांज्यूगेट लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आला.

नागपूर मनपाच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये ही लस नि:शुल्क दिली जात आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये या लसीची किमत चार हजार रुपये आहे. परंतु केंद्र शासनाने देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये लहान मुलांसाठी लस मोफत उपलब्ध करून दिली आहे. बाल मृत्यूदर रोखण्यास ही लस अत्यंत प्रभावी ठरत आहे तसेच न्यूमोनियासाठीही फायदेशीर आहे.

बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालकांनी आपल्या बाळांना ही लस देण्याचे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना केले. वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर व डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका यावलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर शहरातील दवाखान्यातील ५३ लसीकरण केंद्रावर ९८७ बाह्य सत्रांमध्ये ही लस देण्यात येईल. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीचा पहिला डोस दीड महिना पहिला पेंटासोबत, दुसरा डोस साडेतीन महिने तिसऱ्या पेंटासोबत व तिसरा बूस्टर डोस नऊ महिन्यात एम.आर.सोबत देण्यात येईल.

न्यूमोकॉकल लसीकरण मोहीम राज्यात सर्वच ठिकाणी राबविली जात आहे व यामध्ये शासनाच्या सूचनेप्रमाणे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पी.सी.व्ही. लसीकरण केल्यास बालकांमधील न्यूमोकॉकल आजार व त्यामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यास मदत होईल. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. संजय चिलकर यांनी केले आहे.

....

अशी आहेत या आजाराची लक्षणे

-लक्षणे खोकला

- ताप येणे

- धाप लागणे

- श्वास घेण्यास त्रास होणे

Web Title: Pneumococcal vaccination to prevent infant mortality