पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 09:50 PM2019-09-05T21:50:41+5:302019-09-05T21:52:26+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या ७ सप्टेंबर रोजीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.

PM Narendra Modi visits: Collector reviews | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

googlenewsNext
ठळक मुद्देएसपीजी दाखल : कडेकोट पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या ७ सप्टेंबर रोजीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.
छत्रपती सभागृहात पंतप्रधान यांच्या नियोजित नागपूर येथील विविध कार्यक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी पोलीस, महामेट्रो, आरोग्य, एम्स, महानगर पालिका, अन्न व औषध प्रशासन, मिहान, एअर इंडिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामेट्रोच्या सुभाषनगर ते बर्डी या प्रवासी सेवेचा शुभारंभ होत आहे. तसेच विभागीय क्रीडा संकुल येथे मुख्य समारंभात विविध योजनांचे तसेच एम्सच्या ओपीडीचे उद्घाटन, वन हेल्थ सेंटर, नॅशनल लेव्हल पेन्शन स्कीम फॉर ट्रेडर्स अ‍ॅण्ड शॉपकिपर, नागपूर-उमरेड व गोंडखैरी- धापेवाडा या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हायवेच्या कामाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमासंदर्भात सुरक्षा व्यवस्था, नियोजित कार्यक्रमाची पूर्वतयारी तसेच विविध मार्गावरील आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता, विद्युत व्यवस्था आदी बाबतही विविध विभाग प्रमुखांकडून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आढावा घेतला.
चोख सुरक्षा व्यवस्था : ठिकठिकाणची वाहतूक वळवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ वाढली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) उपराजधानीत दाखल झाला असून, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी २४०० पोलीस तैनात करण्यात आले असून, सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी यासंबंधाने गुरुवारी पत्रकारांना माहिती दिली.
शनिवारी दुपारी ४ वाजता सीताबर्डी-लोकमान्यनगर मेट्रो स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान सुभाषनगर ते सीताबर्डीपर्यंत मेट्रोतून सफर करणार आहेत. त्यानंतर ते मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांचा हा प्रवास कारने होणार असून, प्रवास तसेच कार्यक्रमादरम्यानची सुरक्षा व्यवस्था (बंदोबस्त) सांभाळण्यासाठी शहर पोलिसांनी तयारी केली आहे. मेट्रो स्थानकाच्या तसेच क्रीडा संकुलाच्या सभोवताल चोख सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. ११ पोलीस उपायुक्त, २३ सहायक आयुक्त, ८० पोलीस निरीक्षक, २०० सहायक आणि उपनिरीक्षक तसेच २१०० पोलीस कर्मचारी ही सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत. आनंद टॉकीज ते मुंजे चौक, मुंजे चौक ते व्हेरायटी चौक आणि झाशी राणी चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंगला मनाई (नो-पार्किंग) करण्यात आली आहे. याशिवाय सोनेगाव मंगलमूर्ती चौक, हिंगणा टी-पॉईंट, सुभाषनगर, मातामंदिर, पंचशील चौक, महाराजबाग, व्हेरायटी चौक, टेम्पल बाजार गल्ली, एलआयसी चौक, मानकापूर चौक, पागलखाना चौक, पूनम चेम्बर, बिजलीनगर आदी भागातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त महावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ४ वाजतापासून ते पंतप्रधानांचा कार्यक्रम संपेपर्यंत संबंधित ठिकाणी काही वेळेसाठी ही व्यवस्था असेल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. वाहन चालक आणि नागरिकांनीही यासंबंधाने सहकार्य करावे, असे ते म्हणाले. यापूर्वी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या दौºयाच्या वेळी झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असेही महावरकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. विभागीय क्रीडा संकुलात कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी किमान एक तास अगोदर यावे. मोबाईल व्यतिरिक्त कोणतेही साहित्य सोबत नेण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त विनिता साहू, विशेष शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर तसेच वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक जयेश भांडारकर, मेट्रोचे सुरक्षा अधिकारी अरविंद गिरी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पांडे उपस्थित होते.
 

असा आहे बंदोबस्त

  • ११ पोलीस उपायुक्त

 

  • २३ सहायक पोलीस आयुक्त

 

  • ८० पोलीस निरीक्षक

 

  • २०० सहायक निरीक्षक उपनिरीक्षक

 

  • २१०० पोलीस कर्मचारी

 

  • राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी


वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त

  • २ पोलीस उपायुक्त

 

  • ४ सहायक पोलीस आयुक्त

 

  • १५ पोलीस निरीक्षक

 

  • ८०० वाहतूक पोलीस

 

Web Title: PM Narendra Modi visits: Collector reviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.