नागपूरच्या भूमीतून पंतप्रधानांकडून भविष्यातील पंचसूत्रीचे संकेत; संघ-भाजपमध्ये ‘ऑल इज वेल’ असल्याचा संदेश
By योगेश पांडे | Updated: March 30, 2025 23:15 IST2025-03-30T23:15:03+5:302025-03-30T23:15:41+5:30
आत्मनिर्भर भारत, सामाजिक समरसतेवर सरकार देणार भर

नागपूरच्या भूमीतून पंतप्रधानांकडून भविष्यातील पंचसूत्रीचे संकेत; संघ-भाजपमध्ये ‘ऑल इज वेल’ असल्याचा संदेश
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठवड्यात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नागपुरात झालेल्या दंगलींचीच चर्चा होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपुरात येत संघभूमी-दीक्षाभूमीत नमन केले आणि भविष्यातील पंचसूत्रीचे संकेत दिले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी संघ व भाजपमध्ये ‘ऑल इज वेल’ असल्याचा संदेश देत भविष्यात समन्वय आणखी मजबूत होईल हा कृतीतून संदेश दिला. तर दुसरीकडे भाषण व सोलारमधील भेटीतून सामाजिक समरसता, आत्मनिर्भर भारत, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण यावर सरकारचा भर असेल याचे स्पष्ट संकेतच दिले.
मागील दहा वर्षांमध्ये अनेकदा संघ व भाजपमध्ये हवा तसा समन्वय नसल्याचा मुद्दा अनेकदा चर्चेला आला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीअगोदर एक वक्तव्य करत या चर्चेला आणखी मजबुती दिली होती. लोकसभा निकालात अपेक्षित निकाल न मिळाल्यानंतर भाजप धुरिणांनी विविधांगी मंथन केले व संघाची साथ किती महत्त्वाची आहे हे पक्षश्रेष्ठींना पटवून दिले. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या महाराष्ट्र निवडणुकीत संघ पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाचा प्रभाव दिसून आला होता. मागील जवळपास ११ वर्षांत नागपुरात येऊनही पंतप्रधान एकदाही संघस्थानी न गेल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र वर्षप्रतिपदेच्या दिवशी मोदी यांनी संघस्थानी येत कृती व वाचेतून संघ-भाजपमध्ये ‘ऑल इज वेल’ असल्याचा संदेशच दिला.
दीक्षाभूमीलादेखील तेवढेच महत्त्व
शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तनाच्या बिंदूंवर काम सुरू झाले असून त्यात सामाजिक समरसतेचा प्रमुख मुद्दा आहे. पंतप्रधानांनी संघभूमीत नमन केल्यानंतर काही मिनिटांतच दीक्षाभूमी गाठून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले. भाषणातदेखील त्यांनी दीक्षाभूमीबाबत गौरवोद्गार काढत सामाजिक समरसतेच्या संघाच्या बिंदूला पुढे नेण्याचे काम केले. सरकारकडून सामाजिक ऐक्याच्या दिशेेने नवीन पावले उचलण्यात येतील हे निश्चित असल्याचे भाष्य एका संघ पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना केले.
‘सोलार’ भेटीचे असेही महत्त्व
सोलार एक्सप्लोसिव्हच्या टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात सोलारचे महत्त्व वाढते आहे. भारतीय सैन्यासाठी मल्टिमोडल ग्रेनेड्स व इतर अत्याधुनिक शस्त्रे भारतीय मातीत तयार करण्याचे श्रेय सोलारला जाते. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादनांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यावर केंद्राचा भर आहे. या भेटीतून मोदींनी या संकल्पाला आणखी दृढता दिल्याचेच बोलले जात आहे.
विकास, आरोग्य मजबुती ‘साथ-साथ’
२०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी रविवारच्या भाषणात बोलून दाखविला. तसेच पुढील हजार वर्षाच्या विकसित भारताचा पाया आपण रचू, असा विश्वास व्यक्त केला. विकासाबाबत बोलत असताना त्यांनी देशातील आरोग्य क्षेत्रावरदेखील मौलिक भाष्य केले. गरिबातील गरिबापर्यंत चांगले उपचार पोहोचविण्याचा संकल्प बोलून दाखवत त्यांनी देशाचा विकास व आरोग्य क्षेत्राची बळकटी हे प्रमुख मुद्दे केंद्रासमोर असल्याचेच दाखवून दिले.