पंतप्रधान मोदींनी पूजाला न्याय द्यावा, तडस यांची उमेदवारी रद्द करावी - सुषमा अंधारे

By कमलेश वानखेडे | Published: April 11, 2024 06:49 PM2024-04-11T18:49:58+5:302024-04-11T18:53:38+5:30

सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यादेखील आपल्या लहान मुलासह पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या.

PM Modi should give justice to Pooja Tadas says sushma Andhare | पंतप्रधान मोदींनी पूजाला न्याय द्यावा, तडस यांची उमेदवारी रद्द करावी - सुषमा अंधारे

पंतप्रधान मोदींनी पूजाला न्याय द्यावा, तडस यांची उमेदवारी रद्द करावी - सुषमा अंधारे

नागपूर : वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची सून, त्यांचा मुलगा पंकजची पत्नी म्हणून आपल्याला हक्क मिळावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या पूजा तडस यांच्या समर्थनार्थ गुरुवारी ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे पुढे आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वर्धा येथील नियोजित सभेआधी पूजाला न्याय द्यावा आणि सुनेवर अन्याय करणारे रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी अंधारे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत केली.

सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यादेखील आपल्या लहान मुलासह पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. या वेळी अंधारे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २० एप्रिल रोजी वर्धा येथे प्रचारसभा आहे. पूजा तडस यादेखील मोदी परिवारातील आहेत. पण, खा. रामदास तडस यांनी त्यांना सून म्हणून स्वीकारण्यास नकार देत त्यांचा संसार उद्ध्वस्त केला आहे. लोकप्रतिनिधी एका सुनेला न्याय देऊ शकत नाहीत. आपल्यावर होत असलेला अन्याय लोकांपर्यंत नेता यावा म्हणून पूजा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी वर्धेत सभा घेण्यापूर्वी तडस हे आपल्या परिवाराला सांभाळत आहेत का, याची विचारणा करावी. तसेच नैतिकता म्हणून त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली. गेल्या काळात महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली. पण, आता महिला आयोगाच्या अध्यक्षच भाजपच्या गटात सामील झाल्या आहेत. त्यामुळे आता त्यांना कारवाई करण्यात रस नाही, असा नेम त्यांनी महिला आयोगावर साधला.

मागील काळात बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी पंकज तडस यांनी माझ्यासोबत लग्न केले. मला फ्लॅटवर नेऊन टाकण्यात आलं. पहिल्यांदा गर्भपात केला. दुसऱ्यांदा मूल जन्माला आले. आज मला १७ महिन्यांचे बाळ आहे. हे बाळ माझे नसल्याचा आरोप करीत मला डीएनए कर म्हणतात. मी या बाळासाठी डीएनए करण्यास तयार आहे; पण, ते कोर्टातून परवानगी घेऊन करावे.
- पूजा तडस

निवडणुका आल्यावर गंभीर आरोप होतात. त्यांची कोर्टात केस सुरू आहे. मुलगा आणि मुलगी यांनी लग्न केलं हे देखील मला माहीत नाही. माझा यामध्ये काही संबंध नाही. ती आमच्यासोबत राहत नाही. तिने तिच्या नवऱ्यासोबत राहावं. कोर्टात केस सुरू आहे त्यामुळे मला याचं काही देणं-घेणं नाही. त्यांनी त्यांचं पुढे पाहावं.

- रामदास तडस 

Web Title: PM Modi should give justice to Pooja Tadas says sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.