दर्यापूर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल अनेक रुग्णांच्या भाजीमध्ये शनिवार दुपारी चक्क अळ्या व सोंडे निघाले. रुग्णांना प्रशासनामार्फत मोफत जेवण दिले जाते. ते निकृष्ट असल्याचा संताप व्यक्त करीत रुग्णांच्या नातेवाइकांनी कारवाईची मागणी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील शेकडो रुग्ण विविध उपचारासाठी येत असतात. काही दुर्धर आजाराचे वयोवृद्ध व इतर रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यासाठी कधी औषधी व लसींचा तुटवडा असतो, तर कधी डॉक्टर वेळेवर हजर नसतात.
त्यात आता मोफत जेवणात अळ्या, सोंडे निघाल्याने भर पडली. काही रुग्णांनी हा प्रकार निदर्शनास येताच ताटच कचरापेटीच्या स्वाधीन केले.
थेट वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात जाऊन डब्यातील अळ्या, सोंडे असलेली भाजी दाखवली. त्यावेळी जेवण पुरविणाऱ्या महिलेने मला दम देत अरेरावी केली. रुग्णालय प्रशासनाने तातडीने दखल न घेता उडावाउडवीची उत्तरे दिली, असे एका रुग्णासोबत असलेल्या मीना वाकपांजर यांनी सांगितले.
भाजीत अळ्या निघाल्याचे एका महिलेने निर्दशनास आणून दिले आहे. पंचनामा करून जेवण पुरविणाऱ्या ठेकेदार अमित गोंडचोर यांना तातडीने नोटीस देण्यात येईल. पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहे, असा खुलासा दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुणवंत जढाळ यांनी केला.