किसान अधिकार अभियानाचे ‘थाळी वाजवा’
By Admin | Updated: December 20, 2014 02:31 IST2014-12-20T02:31:56+5:302014-12-20T02:31:56+5:30
आश्वासन देऊन पाच दिवस होऊनही किसान अधिकारी अभियानाच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी आमंत्रित न केल्यामुळे किसान अधिकार ...

किसान अधिकार अभियानाचे ‘थाळी वाजवा’
नागपूर : आश्वासन देऊन पाच दिवस होऊनही किसान अधिकारी अभियानाच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी आमंत्रित न केल्यामुळे किसान अधिकार अभियानाचा मोर्चा आज पुन्हा मॉरिस कॉलेज टी पॉईंटवर धडकला. दिवसभर मोर्चात सहभागी आंदोलनकर्त्यांनी थाळी वाजवा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
किसान अधिकार अभियानाच्या वतीने पाच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सेवाग्राम ते नागपूर असा पायी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी २५ हजार आर्थिक मदत देऊन चार हेक्टरपर्यंत मदत करावी, कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, दुष्काळाच्या स्थितीतील शेतकऱ्यांना शेतीतील पिकांच्या पूर्व मशागतीसाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे व उर्वरित कामासाठी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत मजुरीचा अंतर्भाव करून शेतकऱ्यांना मदत करावी, दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे मागील १० वर्षाचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, वर्धा, बुलढाणा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी काढून देण्यास सहकार्य करावे आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या होत्या. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोर्चास्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिष्टमंडळाला चर्चेस बोलविण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला होता. आज पुन्हा किसान अधिकार अभियानाचा मोर्चा मॉरिस कॉलेजवर पोहोचला. मोर्चेकऱ्यांनी हातात ताट, वाटी घेऊन दिवसभर थाळी वाजवा आंदोलन केले.