भारताला सलामीला पराभवाचा धक्का
वन डे मालिका : धावडोंगर उभारणाऱ्या ऑस्ट्रेलियाची ६६ धावांनी सरशी, १-० ने आघाडी
सिडनी : कोरोनामुळे तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सिडनी मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारतावर ६६ धावांनी मात करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ८ बाद ३०८ धावांपर्यंतच मजल मारता आली. हार्दिक पांड्याने ९० तर शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली, तथापि दोघांचेही प्रयत्न व्यर्थच ठरले. कर्णधार विराट कोहलीने २१ चेंडूत केवळ २१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू ॲडम झम्पा याने चार तर हेजलवूडने तीन आणि मिशेल स्टार्कने एक बळी घेतला.
त्याआधी, कर्णधार फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या धडाकेबाज शतकांच्या बळावर यजमान संघाने ६ बाद ३७४ पर्यंत मजल मारली. क्षेत्ररक्षणादरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या गलथान कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. अनेक झेलदेखील सुटले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीने सर्वच गोलंदाजांना चोप दिला. मॅक्सवेलने आपली जबाबदारी पूर्ण करत फटकेबाजीला सुरुवात करत ऑस्ट्रेलियाला स्मिथच्या साथीने त्रिशतकी धावसंख्या ओलांडून दिली. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने तीन तसेच बुमराह, सैनी आणि चहल यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद केला.