रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा तुटवडा
By Admin | Updated: October 8, 2014 00:52 IST2014-10-08T00:52:17+5:302014-10-08T00:52:17+5:30
एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) डेंग्यूचे ६० रुग्ण भरती आहेत. अनेक खासगी इस्पितळांमध्येही हीच स्थिती आहे, परिणामी डेंग्यू रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे

रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा तुटवडा
मेडिकलमध्ये डेंग्यूचे ६० रुग्ण : खासगी इस्पितळांमध्येही गर्दी
नागपूर : एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) डेंग्यूचे ६० रुग्ण भरती आहेत. अनेक खासगी इस्पितळांमध्येही हीच स्थिती आहे, परिणामी डेंग्यू रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्यासाठी जीवनदायी ठरणाऱ्या प्लेटलेटच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, रक्तपेढ्यांमध्ये त्याचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू झाली आहे. यात दुर्मिंळ रक्तगटाच्या प्लेटलेट मिळविणे अडचणीचे ठरत आहे.
हवेतील वातावरण बदल, विषाणूंचा संसर्ग तसेच डेंग्यूच्या डासांमुळे तापाचे रुग्ण घराघरांमध्ये आढळून येत आहेत. शहरात डेंग्यूच्या रुग्णांनी शंभरी गाठली आहे. ही आकडेवारी महानगरपालिकेची आहे. मात्र याच्या दुप्पट रुग्ण खासगी इस्पितळांत असल्याचे चित्र आहे. शासकीय रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मागील आठवड्यांपासून सर्वच रक्तपेढीत डेंग्यूच्या रुग्णांसाठी प्लेटलेटची मागणी वाढली आहे.
एका खासगी रक्तपेढीच्या अधिकाऱ्याने सांगितले, डेंग्यूसह अन्य आजरांसाठी प्लेटलेटचा वापर वाढला. विशेष म्हणजे, डेंग्यूचे रुग्ण जेवढे दाखल होत आहेत तेवढ्याच प्रमाणात कर्करोगाच्या रुग्णालाही प्लेटलेटची गरज लागत आहे.
यामुळे डॉक्टरांकडून प्लेटलेटची मागणी वाढली आहे. परिणामी रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा तुटवडा निर्माण झाला आहे.
मेडिकल रक्तपेढीही अडचणीत
मेयो रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तातून प्लेटलेट स्वतंत्र काढण्याची यंत्रणा नाही. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्लेटलेटसाठी मेडिकल किंवा खासगी रक्तपेढ्यांकडे बोट दाखविले जात आहे. खासगीमध्ये याची किंमत गरीब रुग्णांना परडवणारी नसल्याने मेडिकलवरच अनेकांची भिस्त आहे. विशेष म्हणजे याच रुग्णालयात डेंग्यूचे ६० रुग्ण भरती आहेत.
यातील अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांना प्लेटलेटची गरज आहे, दुसरीकडे कर्करोग व इतरही रुग्णांना याची गरज भासत असल्याने मेडिकलची रक्तपेढी अडचणीत आली आहे.
दुर्मिळ रक्तगटाच्या प्लेटलेटचा अभाव
मेडिकलमध्ये दिवसाकाठी सुमारे पन्नासवर रक्त पिशव्यांची गरज भासते. परंतु याच्या तुलनेत एवढे रक्त गोळा होत नाही. येथील वरिष्ठ डॉक्टर रक्त मिळविण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करीत असले तरी ते तोकडे पडत आहे. विशेषत: दुर्मिळ रक्तगटाचे रक्तच मिळत नसल्याने अडचणीत सापडले आहेत. सध्याच्या स्थितीत दुर्मिळ रक्तगटाचे प्लेटलेटचा अभाव असून इतर गटाचे फक्त दोन-दोन प्लेटलेट्सच्या पिशव्याच उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)