प्लॅटफार्म तिकीट बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:31+5:302021-01-02T04:07:31+5:30
नागपूर : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकिटांची विक्री बंद केली आहे. नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या सुरु आहेत. कन्फर्म तिकिट ...

प्लॅटफार्म तिकीट बंदच
नागपूर : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकिटांची विक्री बंद केली आहे. नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या सुरु आहेत. कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकाच्या आत सोडण्यात येत आहे. परंतु नातेवाईकांना भेटण्यासाठी तसेच पार्सल पोहोचविण्यासाठी नागरिकांना आत सोडण्यात येत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. अशा स्थितीत त्यांना नातेवाईकांच्या भेटीपासून वंचित राहण्याची पाळी येत असल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर पसरत आहे.
प्लॅटफार्म तिकिटाची किंमत पूर्वी १० रुपये होती. परंतु कोरोनामुळे रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये केले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. सहा महिने रेल्वेगाड्या बंद होत्या. केवळ श्रमिक स्पेशल आणि पार्सल रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. या गाड्यात केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. परंतु प्लॅटफार्म तिकीट बंद असल्यामुळे इतर नागरिकांना रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश देणे बंद आहे. अनेकदा प्रवास करणारे प्रवासी आपल्या नातेवाईकांना भेटीसाठी प्लॅटफार्मवर बोलावितात. बहुतांश वेळा पार्सल पोहोचविणे, जेवणाचा डबा देण्याची गरज नागरिकांना भासते. परंतु प्लॅटफार्म तिकीट बंद असल्यामुळे त्यांचा नाईलाज होत आहे. रेल्वेस्थानकावर गेल्यानंतर त्यांना आत प्रवेश नाकारण्यात येत असल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जाण्याची पाळी येत आहे. प्लॅटफार्म तिकिटांची विक्री बंद असल्यामुळे रेल्वेचेही नुकसान होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने महत्वाचे काम असलेल्या नागरिकांना रेल्वेस्थानकात सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
प्लॅटफार्मवर गर्दी होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आली आहे. कोरोनात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सध्या प्लॅटफार्म तिकिट सुरु करण्याबाबत मुख्यालयाकडून आदेश आलेले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत प्लॅटफार्म तिकिटांची विक्री बंद राहील.
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग