प्लास्टिक कंपनीला आग
By Admin | Updated: June 4, 2015 02:28 IST2015-06-04T02:28:47+5:302015-06-04T02:28:47+5:30
स्थानिक डोंगरगाव एमआयडीसी(महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ)तील प्लास्टिक कंपनीला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

प्लास्टिक कंपनीला आग
काटोल एमआयडीसीतील घटना : चार तासानंतर आग आटोक्यात
काटोल : स्थानिक डोंगरगाव एमआयडीसी(महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ)तील प्लास्टिक कंपनीला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. त्यात यंत्र आणि इतर सहित्य असे एकूण अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवार असल्याने कंपनी बंद होती. परिणामी कामगार कामावर नव्हते, अन्यथा जीवितहानी झाली असती. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
प्रेशियस ओरॅपॅक इंडस्ट्रिज असे नुकसान झालेल्या कंपनीचे आणि पृथ्वी अवतारसिंग मक्कड असे नुकसानग्रस्त मालकाचे नाव आहे. २०१२ पासून ती डोंगरगाव एमआयडीसीत सुरू आहे. तेथे सद्यस्थितीत २० कामगार काम करतात. या कंपनीत वायर गुंडाळण्यासाठी उपयोगात येणारी प्लास्टिक चक्री बनविण्याचे काम केले जाते. बुधवारी दुपारच्या सुमारास या कंपनीतून धूर येताना काही नागरिकांना दिसला.
याबाबत लगेच कामगारांना माहीत होताच त्यांनी मालकाचा मुलगा गौरवजितसिंग यांना माहिती दिली. त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. आगीची तीव्रता पाहता काटोल नगर पालिकेच्या अग्शिनमन दलासह कळमेश्वर, नरखेडच्या दलासही सूचना देण्यात आली. तब्बल चार तासानंतर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीची माहिती मिळताच काटोलचे तहसीलदार सचिन गोसावी, नायब तहसीलदार रमेश कोळपे, मंडळ अधिकारी मुन्ना मिश्रा, तलाठी राखी महाजन, पोलीस उपनिरीक्षक दीपक मस्के, प्रदीप पडोळे, कैलास उईके, रत्नाकर ठाकरे आदी हजर झाले. आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
आगीत तेथील कच्चा माल, यंत्रसामुग्री खाक झाली. (तालुका / प्रतिनिधी)
- तर अनर्थ झाला असता!
आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या या कंपनीत २० कामगार काम करतात. प्लास्टिकच्या चक्री तेथे तयार करण्यात येतात. बुधवारी एमआयडीसीतील बहुतांश कंपन्या बंद असतात. ही कंपनीसुद्धा बंद होती. या कंपनीत आग लागली त्यावेळी कुणीही नव्हते. बुधवार व्यतिरिक्त इतर दिवशी कामाच्या वेळात आग लागली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला.