जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळतील असे नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 20:48 IST2022-02-14T20:48:10+5:302022-02-14T20:48:43+5:30
Nagpur News जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे केली.

जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळतील असे नियोजन करा
नागपूर : नागपूर आणि विदर्भामध्ये विपुल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिकस्थळे, रस्ते, पॉवर हब आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचे जाळे उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे केली. नागपुरात जंगल सफारीसोबतच ‘हेरिटेज वॉक’ आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी आयोजित नागपूर जिल्ह्याच्या पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, खासदार कृपाल तुमाने, आ. आशिष जयस्वाल, आ. अभिजित वंजारी,आ. राजू पारवे, नरेंद्र बोंडे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक विजयकुमार नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई, राज्य पुरातत्व विभागाच्या जया वाहने उपस्थित होत्या.
यावेळी ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राऊत यांनी पर्यटन विकासाबाबत जिल्ह्याला वाढीव निधी उपलब्ध करण्याची मागणी केली.
विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात
पर्यावरण संवर्धन करताना विकासाला खोळंबा होतो हा गैरसमज आहे. अनेक प्रकल्प उत्तम समन्वयातून यशस्वीरीत्या साकारले आहे. त्यामुळे योग्य नियोजनातून व राजकीय तसेच अन्य व्यासपीठांवर पर्यावरणविषयक चर्चा घडवून आणल्यास मार्ग निघू शकतो. विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात ‘माझी वसुंधरा’ या मोहिमेचा विभागीय आढावा त्यांनी घेतला. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नगर प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.