रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:45+5:302021-02-05T04:42:45+5:30
जलालखेडा : चांगल्या रस्त्यासाठी नरखेड आणि काटोल तालुक्याची ओळख आहे; परंतु बी बाब आता खोटी ठरत असल्याचे दिसून येत ...

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता ?
जलालखेडा : चांगल्या रस्त्यासाठी नरखेड आणि काटोल तालुक्याची ओळख आहे; परंतु बी बाब आता खोटी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागात रस्ते चांगले असले तरी ग्रामीण भागातील रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. जलालखेडा ते थंडीपवनी रस्त्याची मोठी दयनीय परिस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर जवळपास ८ ते १० गावे आहेत. या भागातील नागरिकांना सतत कामानिमित्त जलालखेडा येथे यावे लागते; परंतु रस्ता खूप खराब असल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जलालखेडा ते मुक्तापूरपर्यंतचा रस्ताही खड्डेमय झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये ३ ते ४ दुचाकीस्वार गाडी स्लीप होऊन पडले. त्यात त्यांना किरकोळ जखम झाली. त्यामुळे या भागातील नेत्यांनी वेळीच लक्ष देऊन रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिल्यास या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही.
खड्डे मुक्त प्रवास कधी?
प्रत्येकवेळी निवडणुकीअगोदर राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आश्वासन दिले जाते. नागरिकांना चांगले रस्ते, आरोग्य, मूलभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, नोकरी अशा अनेक गोष्टींचा यात समावेश असतो; परंतु आजही ग्रामीण भागात रस्त्याची अवस्था सुधारलेली नाही. त्यामुळे खड्डे मुक्त प्रवास कधी होणार असा सवाल येथील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.