रंजित सफेलकरकडून पिस्तूल जप्त
By Admin | Updated: June 10, 2016 02:49 IST2016-06-10T02:49:18+5:302016-06-10T02:49:18+5:30
अनेक वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित असलेला कामठी नगर परिषदेचा उपाध्यक्ष रंजित सफेलकर याच्या वाहनातून जुनी कामठी पोलिसांनी पिस्तूल,

रंजित सफेलकरकडून पिस्तूल जप्त
जिवंत काडतुसे सापडली : परवानाही बनावट
नागपूर : अनेक वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित असलेला कामठी नगर परिषदेचा उपाध्यक्ष रंजित सफेलकर याच्या वाहनातून जुनी कामठी पोलिसांनी पिस्तूल, जिवंत काडतूसे आणि बनावट मुद्रांक जप्त केला. पिस्तुलाचा परवाना बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सफेलकरविरुद्ध हत्यार कायद्यासोबतच फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सफेलकर कामठी नगर परिषदेचा उपाध्यक्ष असून, त्याची पत्नी मीना यासुद्धा नगरसेविका आहेत. सफेलकर श्रीराम सेनेचाही पदाधिकारी आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, अनेक गंभीर आणि वादग्रस्त प्रकरणात सफेलकरचे नाव जुळले आहे. त्यामुळे पोलीस त्याच्यावर नेहमीच नजर ठेवून असतात. २६ मेच्या मध्यरात्री जुनी कामठी पोलिसांच्या पथकाने संशयावरून सफेलकरच्या वाहनाची झडती घेतली. त्यात पोलिसांना एक पिस्तूल, १४ जिवंत काडतुसे आणि मुद्रांक (स्टॅम्प पेपर) आढळला. ही बाब कळताच ठाणेदार जयेश भंडारकर यांनी सफेलकरकडे पिस्तुलाच्या परवान्याबाबत चौकशी केली. यावेळी त्याने पोलिसांना परवाना दाखविला, तो मोहत्तीपूर, पो.स्टे. गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील होता. सफेलकर कामठीत राहतो आणि त्याला गोरखपूर प्रशासनाने पिस्तुलाचा परवाना कसा दिला, असा संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी त्याला त्यावेळी विचारपूस केली अन् सोडून दिले. या परवान्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर जुनी कामठी पोलीस ठाण्याचे एक पथक चौकशीसाठी गोरखपूरला पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पोलखोल
पोलीस पथकाने सफेलकरच्या पिस्तूल परवान्याबाबत गोरखपूरच्या जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली. त्यांना जप्त केलेली कागदपत्रे (परवाना, मुद्रांक) दाखविली. दरम्यान, सफेलकरच्या नावाने असा परवानाच देण्यात आला नाही आणि त्याने दाखवलेला परवाना बनावट असल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी गोरखपूर यांनी पोलीस आयुक्तालयाच्या नावे दिले. हे प्रमाणपत्र घेऊन जुनी कामठीचे पोलीस पथक आज परतले. या अहवालाची माहिती ठाणेदार भंडारकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वरिष्ठांकडून मिळालेल्या निर्देशानुसार, सफेलकरविरुद्ध अवैध शस्त्र बाळगण्याच्या तसेच बनावट कागदपत्रे (परवाना, मुद्रांक) सादर करून फसवणूक करण्याच्या आरोपाखाली गुरुवारी गुन्हे दाखल केले. या प्रकरणाची माहिती कळताच राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली. दरम्यान, पोलीस पथकाने सफेलकरच्या घरी चौकशी केली तेव्हा तो आढळला नाही. तो फरार असून, आम्ही त्याची चौकशी करीत असल्याचे ठाणेदार भंडारकर यांनी पत्रकारांना सांगितले.