पिस्तुलाच्या परवान्याने पोलीस अडचणीत
By Admin | Updated: August 20, 2016 02:19 IST2016-08-20T02:19:25+5:302016-08-20T02:19:25+5:30
कुख्यात गुंडाशी सौदेबाजी करून पिस्तुल परवान्याची मिसिंग (हरविल्याची) पोच दिल्यामुळे पाचपावली पोलीस ठाण्यातील मंडळी अडचणीत आली आहे.

पिस्तुलाच्या परवान्याने पोलीस अडचणीत
गुंडाशी सौदेबाजी : पाचपावलीतील वातावरण गरमनरेश डोंगरे ल्ल नागपूर
कुख्यात गुंडाशी सौदेबाजी करून पिस्तुल परवान्याची मिसिंग (हरविल्याची) पोच दिल्यामुळे पाचपावली पोलीस ठाण्यातील मंडळी अडचणीत आली आहे. पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याने ठाण्यातील सौदेबाजात खळबळ निर्माण झाली आहे.
कामठीचा हा गुंड गुन्हेगारी वर्तुळासोबतच पोलिसांमध्येही सेटिंगबाज म्हणून ओळखला जातो. मोठमोठे गुन्हे करूनही पोलीस मित्रांशी असलेल्या सेटिंगचा फायदा घेत तो स्वत:ला गुन्ह्याच्या कारवाईपासून दूर ठेवतो. दोन महिन्यांपूर्वी पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांना त्याच्याकडे पिस्तुल असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे या गुंडाची चौकशी सुरू झाली. त्याचा परवाना तपासण्यात आला. तो गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील असल्याचे कळाल्याने बनवेगिरीचा पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्याच्याभोवती कारवाईचा पाश आवळण्याची तयारी झाली.
उपायुक्तांनी मध्यरात्री गाठले ठाणे
नागपूर : पोलीस मित्राच्या माध्यमातून ‘कडक कारवाईची’ कुणकुण लागल्याने या गुन्हेगाराने पाचपावली ठाण्यात धाव घेतली. तेथे त्याने आपला पिस्तुलाचा परवाना हरविल्याचा २० जूनला तक्रारवजा अर्ज दिला. १० नंबर पुल ते इंदोरा चौकादरम्यान परवाना हरविल्याचे सांगत अर्जाच्या झेरॉक्सवर रीतसर पोच (रिसीव्ह) घेतली. बदल्यात पोलीस मित्रांचे खिसे गरम केले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या पोचपावतीचा भक्कम आधार घेत त्याने कोर्टात परवाना हरविल्याचे आणि आपण पाचपावली ठाण्यात तसा तक्रारवजा अर्ज दिल्याचे लेखी निवेदन सादर केले. त्याच्या या पवित्र्यामुळे कारवाईची तयारी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जबर धक्का बसला.
गुन्हेगाराने पोलिसांना मात देण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यामुळे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी गुरुवारी मध्यरात्री पाचपावली ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांनी पिस्तुलाचा परवाना हरविल्याची नोंद कुणी केली अशी विचारणा केली. अडचणीत येण्याचे संकेत मिळाल्याने संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव पुढे केले. (प्रतिनिधी)
बाहेरच्या बाहेरच सौदा
विशेष म्हणजे, या उपनिरीक्षकाची काही दिवसांपूर्वीच जरीपटका ठाण्यात बदली झाली आहे. गुन्हेगाराच्या तक्रार अर्जावर पोच (मिसिंग रिपोर्टवर रिसिव्हड्) देणाऱ्याने बाहेरच्या बाहेरच सौदा केला, असेही सांगण्यात आले. पोलीस ठाण्यात तशी कोणतीही नोंद नसल्याचे सांगून २० जून आणि आजूबाजूच्या तारखांच्या नोंदीही दाखवण्यात आल्या. अभिनाशकुमार यांनी त्या नोंदीचे अवलोकन केले असून, पुढील चौकशी सुरू आहे. या एकूणच प्रकारामुळे पाचपावली ठाण्यात खळबळ निर्माण झाली आहे.