रवी अग्रवालकडेही पिस्तुल परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 02:04 IST2016-08-18T02:04:29+5:302016-08-18T02:04:29+5:30

डब्बा प्रकरणातील आरोपी रवी अग्रवाल याच्याकडेसुद्धा शस्त्र परवाना आहे. बुधवारी कळमना येथील

Pistol license to Ravi Agarwal | रवी अग्रवालकडेही पिस्तुल परवाना

रवी अग्रवालकडेही पिस्तुल परवाना

कळमना पोलिसांच्या तपासात खुलासा : हवेत फायर प्रकरण
नागपूर : डब्बा प्रकरणातील आरोपी रवी अग्रवाल याच्याकडेसुद्धा शस्त्र परवाना आहे. बुधवारी कळमना येथील उमिया पत संस्थेतून पिस्तुल आणि काडतूस मिळाल्यानंतर ही बाब समोर आली. आतापर्यंत पोलीस रवीचा भाऊ नीरज याच्याकडेच शस्त्राचा परवाना असल्याचा दावा करीत होते. परंतु ताज्या प्रकरणामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
डब्बा प्रकरण उघडकीस आल्यानंतर रवीचा भाऊ नीरज याच्याकडे परवाना प्राप्त शस्त्र असल्याची बाब समोर अली होती. पोलिसांनी नीरजला उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीद्वारे ‘रिटेनर’च्या धर्तीवर परवाना दिल्याचे सांगितले होते. हा परवाना नागालँड येथील दिमापूर येथून जारी करण्यात आला होता. परवानाधारकाचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशात संपर्क साधण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले होते.
रवी आणि गोपी मालू हवेत फायरिंग करीत असल्याचा व्हीडिओ ‘व्हायरल’ झाल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. विचारपूस करण्यासाठी बोलावल्यानंतर रवीने टॉयगनने (खेळण्याचे पिस्तुल) फायर केल्याचे सांगितले होते. पोलिसांनी बुधवारी लॉकरमधून पिस्तुल आणि परवाना जप्त केला. यानंतर रवीकडे सुद्धा शस्त्र परवाना असल्याची बाब समोर आली आहे. डब्बा प्रकरणाच्या तपासादरम्यान नीरज अग्रवाल याचा शस्त्र परवाना सापडल्याचे सांगण्यात आले होते. नीरजला जारी करण्यात आलेले शस्त्र अजूनही पोलीस शोधू शकलेले नाही. तसेच रवीकडे शस्त्र परवाना असल्याची बाब पहिल्यांदाच समोर आली आहे.
त्याला २०१४ मध्येच शस्त्र परवाना जारी झाल्याचे सांगितले जाते. त्याने नियमानुसार स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली होती. यानंतरही पोलिसांना याबाबत माहिती नसणे ही बाब अनेक प्रश्न निर्माण करते. परवानाधारक पिस्तुल जर्मनी आणि टॉय गन तुर्की येथील आहे. कळमना पोलीस परवानाधारक पिस्तुल गुरुवारी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pistol license to Ravi Agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.