हवालदाराला उडविणारा निघाला मद्य तस्करांचा पायलट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:21+5:302020-12-02T04:07:21+5:30

नागपूर : ट्रॅफिक पोलिसातील हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी आकाश चव्हाण हा मद्य तस्करीशी निगडित टोळीचा सदस्य आहे. मद्य ...

The pilot of the liquor smuggler who flew the constable () | हवालदाराला उडविणारा निघाला मद्य तस्करांचा पायलट ()

हवालदाराला उडविणारा निघाला मद्य तस्करांचा पायलट ()

नागपूर : ट्रॅफिक पोलिसातील हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी आकाश चव्हाण हा मद्य तस्करीशी निगडित टोळीचा सदस्य आहे. मद्य तस्करीत वापरात येणाऱ्या वाहनाला सुरक्षित चंद्रपूरमध्ये पोहोचवण्यास सक्षम असलेला हा गुन्हेगार वर्षभरापूर्वी मकोका कारवाईतून वाचला होता. शेखू गँगशी संबंधित असलेल्या आकाशवर लक्ष ठेवण्यास पोलिसांकडून दुर्लक्ष झाले आणि त्याचाच परिणाम आकाशने हवालदारालाच चिरडण्याचा प्रयत्न करण्याचे साहस केले.

रविवारी संध्याकाळी ट्रॅफिक ब्रांचचे हवालदार अमोल चिंदमवार यांनी आकाशची कार वाहतूक नियमाअंतर्गत रोखली. यामुळे नाराज झालेल्या आकाशने अमोल यांच्यावरच कार चढवली. प्रसंगावधान राखत अमोल यांनी कारच्या बोनेटवर चढून स्वत:ला सावरले. मात्र, आकाशने कार थांबवण्याऐवजी सक्करदरा चौकाकडून छोटा ताजबागकडे जवळपास एक किलोमीटरपर्यंत वेगाने चालवत नेली होती. आकाश यवतमाळ येथील घाटंजीचा मूळ निवासी आहे. तो बऱ्याच काळापासून कुख्यात शेखू गँगचा सदस्य आहे. शेखू गँग मद्य तस्करीमध्ये लिप्त आहे. या गँगद्वारे दररोज लाखो रुपये किमतीची दारू अवैधरीत्या नागपूरवरून चंद्रपूरमध्ये पोहोचवली जाते. आकाश याच कामात वाहन चालविण्यात तरबेज आहे. तोच नागपुरातून चंद्रपूरकडे दारूची खेप पोहोचवत होता. दारूचा साठा असलेल्या वाहनाच्या अगदी जुजबी अंतरावर पायलट वाहन चालविले जाते. पायलट वाहन मार्ग क्लीअर असल्याचे सांगत असते. याच वाहनाच्या मागे मद्यसाठा असलेले वाहन चालत असते. आकाश पायलट वाहन चालवतो. सप्टेंबर २०१९ मध्ये शेखू गँगने मद्य व्यवसायी प्रशांत आंबटकरचे अपहरण करून दहा लाख रुपयांची खंडणी मागीतली होती.

रुपये न दिल्यामुळे शेखू गँगने आंबटकरला बरेचदा मारण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात आंबटकरने क्राईम ब्रांचकडे तक्रार नोंदवली होती. याच तक्रारीवरून क्राईम ब्रांचने अंबाझरी पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणी वसुलीचे प्रकरण नोंदवले आणि शेखू व आकाश चव्हाणसह सहा आरोपींना अटक केली. खंडणीच्या प्रकरणात क्राईम ब्रांचने शेखू गँगच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस केली. शेखू, शिवा बेजंकीवार आणि अन्य दोन आरोपी निष्णात गुन्हेगार होते. आकाश आणि अन्य एका आरोपीसंदर्भात कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. म्हणून शेखू व शिवासहित चार गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. मकोका लागला नसल्याने पाच महिन्यापूर्वीच आकाश जामिनावर बाहेर आला. शेखू आणि त्याचे तीन साथीदार तुरुंगातच आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यावर काही दिवस शांत राहून आकाशने पुन्हा मद्य तस्करी करण्यास सुरुवात केली. रविवारी ज्या कारने हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न केला, ते वाहनही मद्य परिवहनासाठी वापरले जात असल्याचा संशय आहे. त्याचमुळे खिडक्यांवर काळी फिल्म लावण्यात आली होती. जप्त केलेली कार वडिलांची असल्याचे आकाश सांगत आहे. मद्य तस्करीमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांमध्ये आकाशला वाऱ्याच्या वेगाने वाहन चालविण्यासाठी ओळखले जाते. तस्करीदरम्यान मार्गात अडथळा निर्माण झाल्यास तो कोणत्याही थराला जाण्यास तयार असतो. चंद्रपूरमध्ये मद्यमाफियांनीच पीएसआय छत्रपती चिढे यांची वाहनाखाली चिरडून हत्या केली होती. हवालदार अमोल चिंदमवार यांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता, आपली पोल उघडकीस येईल या भीतीने आकाशने अमोल यांच्यावर वाहन चढविण्याचा प्रयत्न् केला. अमोल बोनेटवर बसल्यावरही आकाशने वाहन थांबविण्याऐवजी आणखी वेगाने पुढे निघाला.

चोरीच्या वाहनांचा उपयोग

मद्य माफियांना पकडले जाण्याची नेहमीच भीती असते. याच कारणाने ते नेहमी तस्करीसाठी चोरीच्या किंवा जामीन असलेल्या वाहनांचाच वापर करतात. वाहन जप्त झाल्यावर ते सोडविण्याची गरज पडत नाही. अशाच तऱ्हेने वाहनाचे इंजिनही बदलले जातात. त्याद्वारे वाहनांची गती प्रचंड वाढवली जाते. पोलिसांच्या सक्तीनंतरही शहरातील काही व्यापारी गुन्हेगारांना तस्करीसाठी मद्याचा साठा उपलब्ध करवून दिला जात आहे. याबाबत पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मद्य व्यावसायिकांना बैठकीत इशाराही दिला होता.

Web Title: The pilot of the liquor smuggler who flew the constable ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.