त्या वाहतूक पोलिसांची उचलबांगडी
By Admin | Updated: April 20, 2017 02:37 IST2017-04-20T02:37:24+5:302017-04-20T02:37:24+5:30
१७ महिन्याच्या चिमुकलीला रुग्णालयात नेत असलेल्या दाम्पत्याला हेल्मेटच्या नावावर मारहाण केल्याप्रकरणी

त्या वाहतूक पोलिसांची उचलबांगडी
दाम्पत्याला मारहाण केल्याचे प्रकरण
नागपूर : १७ महिन्याच्या चिमुकलीला रुग्णालयात नेत असलेल्या दाम्पत्याला हेल्मेटच्या नावावर मारहाण केल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सोळंकी व त्यांचा सहकारी नायक पोलीस शिपाई बाबुसिंग शोभराम कछवाह यांची उचलबांगडी करण्यात आली.
पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी या प्रकरणाला अतिशय गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सोळंकी यांची पोलीस नियंत्रण कक्ष तर कछवाह यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.
अनिल मानसिंग धनोरे (२९) व पत्नी मृणालिनी धनोरे (२७) रा. आनंदनगर, बिनाकी, असे पीडित दाम्पत्याचे नाव आहे तर आरोही असे आजारी मुलीचे नाव आहे.
माणुसकीला काळिमा फासणारा हा संतापजनक प्रकार गुरुवारी इंदोरा चौकात घडला. वाहतूक पोलिसांनी दाम्पत्याची दुचाकी थांबविताच, साहेब मुलीची तब्येत खराब असून तिला रुग्णालयात वेळीच घेऊन जाणे आवश्यक आहे. वाटल्यास तुम्ही फोटो काढून घरी चालान पाठवा, आम्ही भरून देऊ.
मात्र वाहतूक पोलिसांनी काहीही ऐकून न घेता दुचाकी बाजूला लावा, कागदपत्र दाखवा असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला आणि पती-पत्नीला मारहाण केली. शेवटी पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले होते.
याप्रकरणी चौकशीअंती दोन्ही वाहतूक कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. (प्रतिनिधी)
हेल्मेट सक्तीच्या नावावर वसुली
पोलीस आयुक्त वाहतूक पोलीस उपायुक्तांनी हेल्मेटबाबत कारवाई करीत असताना हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकाचे फोटो काढून त्यांना ई-चालान पाठविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असतानाही काही वाहतूक पोलीस वसुली करीत आहेत. ही घटना याचे चांगले उदाहरण आहे.