सीईओंहून पीए भारी!
By Admin | Updated: June 24, 2014 00:49 IST2014-06-24T00:49:57+5:302014-06-24T00:49:57+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शिवाजी जोंधळे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.उबाळे यांचे स्वीय सहायक (पीए) फायली घेऊन येणारे विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुच्छतेने वागतात.

सीईओंहून पीए भारी!
जिल्हा परिषद : लोकांना सीईओंचे दर्शन दुर्मिळ
नागपूर : मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शिवाजी जोंधळे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.उबाळे यांचे स्वीय सहायक (पीए) फायली घेऊन येणारे विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुच्छतेने वागतात. एवढेच नव्हे तर पदाधिकाऱ्यांनाही सन्मानाची वागणूक देत नसल्याने सीईओंहून पीए भारी झाल्याची जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा आहे.
अनेकदा तातडीची चर्चा वा महत्त्वाच्या फायलीवर सही घेण्यासाठी विभागप्रमुख स्वत: येतात. परंतु सीईओंचे पीए अधिकाऱ्यांना तिष्ठत ठेवतात. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही भेटीचा निरोप दिला जात नाही. अधिकाऱ्यांना अपमानित व्हावे लागते. पण व्यथा कुणाकडे मांडणार असा प्रश्न आहे. कधीकधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी फोनवरून सीईओ बैठक वा कामात व्यस्त आहेत का अशी पीएकडे विचारणा करतात. परंतु त्यांना चुकीची माहिती दिली जाते.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण भागातील लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा सोडविण्याचे शासन निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रामटेक तालुक्यातील खेड्यात रात्र घालवली. लोकांच्या व्यथा, तक्र ारी सोडविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे जि.प.मध्ये व्यथा मांडण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दर्शन होत नाही. त्यामुळे मागील काही महिन्यात भेटीसाठी येणाऱ्यांची गर्दीही कमी झाली आहे. उबाळे यांच्या खास मर्जीतील त्यांचे स्वीय सहाय्यक राजू काळे मागील पाच वर्षापासून या पदावर ठाण मांडून आहेत. कर्मचाऱ्यांच्या तीन वर्षानंतर बदल्या होत असल्या तरी येथे हा नियम लागू होत नाही.
काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसारखेच वागतात. तक्र ार करूनही त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे उलटसुलट चर्चा आहे. (प्रतिनिधी)