वाघाच्या बछड्यासोबत फोटोसेशन?
By Admin | Updated: October 31, 2014 00:50 IST2014-10-31T00:50:00+5:302014-10-31T00:50:00+5:30
फोटोसेशनचा आव आणत भिवापुरातील एका तरुणाने उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील वाघाच्या बछड्यासोबत फोटो काढला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर ‘हिरो इधर है’ म्हणत चक्क फेसबुकचा वापर

वाघाच्या बछड्यासोबत फोटोसेशन?
नियमांची पायमल्ली : फेसबुकवर २९ जणांनी नोंदविला अभिप्राय
अभय लांजेवार/शरद मिरे - उमरेड
फोटोसेशनचा आव आणत भिवापुरातील एका तरुणाने उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील वाघाच्या बछड्यासोबत फोटो काढला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर ‘हिरो इधर है’ म्हणत चक्क फेसबुकचा वापर करीत जगभरात हा सारा प्रकार पोहचविण्याची प्रयत्नही केला. त्याच्याच मित्रपरिवारातील एकूण २९ जणांनी ‘लाईक’ करीत त्यांच्या संवेदना व प्रश्न या तरुणाच्या फेसबुक आयडीवर व्यक्त केले. अभयारण्याच्या नियमांची पायमल्ली करणारा हा प्रकार नुकताच उघड झाला आहे.
‘समीर’ (नाव बदललेले) असे या तरुणाचे नाव असून, तो भिवापुरातील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात राहतो. समीरने वाघाच्या बछड्यासोबतचे फोटोसेशन करून फोटो फेसबुकवर अपलोड केलेत. नियमानुसार अभयारण्यातील कोणत्याही वन्यजीवास कुठेही आढळून आला तरी त्याला कुठल्याही परिस्थितीत हाताळण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. मग त्या वन्यजीवासोबत फोटो काढून ते सार्वजनिक करणे ही बाब नियमबाह्य ठरते. एखादा प्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास त्या प्राण्यासंदर्भात पहिल्यांदा वन विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सूचना देऊन कर्तव्य पार पाडता येऊ शकते. मात्र, समीरने अशा कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही. वन्यप्राण्यांसोबत फोटोसेशन करणे हे वनकायद्याचे उल्लंघन आहे. या गंभीर प्रकाराबाबत वन अधिकारी गप्प आहेत. समीरने फुशारकी मारण्याचा केलेला हा प्रकार त्याच्या व वनअधिकाऱ्यांच्या चांगलाच अंगलट येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उमरेड कऱ्हांडला अभयारण्य परिसरातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. परंतु, या गंभीर प्रकाराची अद्याप एकाही वन्यजीव प्रेमीने साधी दखल घेतली नाही, याचे जाणकांरामध्ये नवल व्यक्त केले जात आहे. आपण या जंगलाचे रक्षक म्हणविणारे आता नेमके गेले कुठे आहेत, असा मूलभूत प्रश्न काहींनी खासगीत बोलताना उपस्थित केला आहे. या फोटोत दिसत असलेला वाघाचा बछडा समीरने आणला कुठून, त्याला आणले तर त्याची वनविभागाला पूर्वसूचना दिली काय, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतली काय, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असून, ते अनुत्तरित आहेत. या वाघाच्या बछड्याचे फोटो फेसबुकवर अपलोड करून आठवडा लोटला आहे. या काळात वन अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना याची साधी कुणकुणही का लागली नाही. फोटोतील बछडा किती वर्षाचा आहे, तो नेमका वाघाचाच बछडा की अन्य वन्यप्राणी आदी प्रश्न सद्यस्थितीत अनुत्तरित आहेत.