‘पीएच.डी.’ करायचीय, तीन वर्षे सुटी घ्या
By Admin | Updated: March 15, 2017 02:21 IST2017-03-15T02:21:43+5:302017-03-15T02:21:43+5:30
संशोधनाचा दर्जा सुधारावा व ‘पीएचडी’साठी दर्जेदार उमेदवारांची नोंदणी व्हावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

‘पीएच.डी.’ करायचीय, तीन वर्षे सुटी घ्या
नागपूर विद्यापीठ : संशोधनासाठी इच्छुक असलेले शिक्षक चिंताग्रस्त
नागपूर : संशोधनाचा दर्जा सुधारावा व ‘पीएचडी’साठी दर्जेदार उमेदवारांची नोंदणी व्हावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियम कडक केले आहेत. एखाद्या आस्थापनेत पूर्णकालीन कार्य करणाऱ्या व्यक्तीला ‘पीएचडी’ करायची असेल, तर तीन वर्षे शैक्षणिक रजेचे प्रमाणपत्र नोंदणीअगोदर सादर करावे लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. साधारणत: ‘पीएचडी’ करणाऱ्यांमध्ये शिक्षकांचेच प्रमाण अधिक असते. त्यामुळे या निर्णयामुळे ‘पीएचडी’ करण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूर विद्यापीठातून अगदी सहज ‘पीएचडी’ होते असा समज होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’चा दर्जा सुधारण्यासाठी व योग्य उमेदवारांच्या चाळणीसाठी कठोर नियम लावले. ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ४ मार्चपर्यंत ‘आरआरसी’च्या (रिसर्च अॅन्ड रिकग्निशन कमिटी) बैठकी चालल्या. त्यानंतर नव्या विद्यापीठ कायद्याची अधिसूचना निघाल्यामुळे तांत्रिक कारणांमुळे ‘आरआरसी’ पुढे ढकलण्यात आल्या. मात्र अगोदर झालेल्या ‘आरआरसी’ची नोंदणीपत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आली आणि अनेकांना धक्काच बसला.
उमेदवारांनी व्यक्त केला रोष
नवीन नियमांमुळे धक्का बसलेल्या उमेदवारांनी मंगळवारी कुलगुरूंची भेट घेतली. आम्ही नियमांनुसार ‘पेट’ दिली, व्यवस्थित ‘सिनॉप्सिस’ सादर केले व ‘आरआरसी’लादेखील आत्मविश्वासाने सामोरे गेलो. तेथेदेखील आम्हाला हिरवी झेंडी मिळाली. मात्र अचानकपणे सुट्यांची अट टाकून विद्यापीठाने आमची अडवणूकच केली आहे. अगोदर ही कल्पना उमेदवारांना का देण्यात आली नाही, असा सवाल उमेदवारांनी कुलगुरूंना केला.