सुट्या नोटांसाठी रुग्णांची धावाधाव
By Admin | Updated: November 14, 2016 03:07 IST2016-11-14T03:07:16+5:302016-11-14T03:07:16+5:30
चार दिवस होऊनही इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय

सुट्या नोटांसाठी रुग्णांची धावाधाव
नागपूर : चार दिवस होऊनही इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ५०० व १००० नोटा घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना सुट्या नोटांसाठी परत पाठविले जात आहे. परिणामी, तातडीची ईसीजी करण्यापासून ते एमआरआयची गरज असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना सुट्या पैशांच्या जमवाजमावीसाठी धावाधाव करावी लागत आहे.
चलनातून ५०० व १०००च्या नोटा रद्द झाल्याने याचा सर्वाधिक फटका सामान्य रुग्णांना बसत आहे. मेयो, मेडिकलमध्ये गंभीर रुग्ण असलातरी शुल्क भरल्यावरच त्याच्यावर उपचार होतो. परिचारिकांपासून ते डॉक्टरही शुल्क भरल्याची पावती पाहूनच एक्स-रे ते सोनोग्राफीसाठी आत प्रवेश देतात. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये पैसे भरण्यासाठी एकच खिडकी आहे. ही खिडकी शल्यक्रिया विभागाच्या अपघात विभागात आहे. येथे आधीच शुल्क भरणाऱ्यांची रांग लागलेली असते. यातच ५०० व १०००च्या नोटा स्वीकारत नाही. यामुळे कुठूनतरी सुट्या नोटा मिळविल्यातर पुन्हा रांगेत लागावे लागते. परिणामी, रुग्णाला उपचार मिळण्यास उशीर होतो.
शनिवारी अनेक रुग्णांना सुट्या नोटांच्या नावाखाली परत पाठविण्यात आल्याची माहिती आहे. चार दिवसानंतरही सुट्या नोटा मिळत नसल्यामागे राजकारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)