पेट्रोलियम उत्पादन आजपासून स्वस्त
By Admin | Updated: April 9, 2016 03:09 IST2016-04-09T03:09:54+5:302016-04-09T03:09:54+5:30
महागाईच्या झळा सोसत असणाऱ्या नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने सुखद बातमी दिली आहे.

पेट्रोलियम उत्पादन आजपासून स्वस्त
अधिसूचना जारी : ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’च्या समीक्षेचा परिणाम
नागपूर : महागाईच्या झळा सोसत असणाऱ्या नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने सुखद बातमी दिली आहे. ९ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत घट होणार आहे. पेट्रोलियम उत्पादनाच्या ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’च्या समीक्षेनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
पेट्रोलियम उत्पादनांची दर तीन महिन्यात ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’ ची समीक्षा करणे गरजेचे आहे. परंतु १ जुलै २०१४ पासून समीक्षा झाली नव्हती. त्यावेळेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर १६० डॉलर प्रति बॅरल रेटचा आधार घेत पेट्रोलियम उत्पादनांच्या ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’ आजही चालू होती. जेव्हा की आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलियम उत्पादनांचे दर कमी झाले असताना, समीक्षाच केली नसल्याने ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’ कमी करण्यात आली नव्हती. यासंदर्भात आमदार शोभाताई फडणवीस यांनी गंभीरता दाखवित यासंदर्भात ३ मार्च रोजी त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. त्यांनी हा विषय पेट्रोलियम मंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिला. मंत्र्यांनी या विषयाची दखल घेतल्याने दीड वर्षानंतर पेट्रोलियम उत्पादनांच्या ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’ ची समीक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पेट्रोल १.५९ रुपये व डिझेल १.२३ रुपये, केरोसिन ०६ पैसे, सिलेंडर २ रुपये स्वस्त होईल. यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ९ एप्रिलपासून राज्यात पेट्रोलियम उत्पादने स्वस्त मिळणार आहे.(प्रतिनिधी)