पेट्रोल- डिझेलचे दर वाढते रुपयांनी, घटते पैशानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST2021-03-25T04:08:19+5:302021-03-25T04:08:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने इंधनाच्या दरावरील नियंत्रण हटविल्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मात्र, ...

पेट्रोल- डिझेलचे दर वाढते रुपयांनी, घटते पैशानी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने इंधनाच्या दरावरील नियंत्रण हटविल्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मात्र, गेल्या २४ दिवसापासून हे दर स्थिर होते. बुधवारी दोन्ही इंधनाच्या दरात अल्पशी घसरण नोंदविली गेली आहे. विशेष म्हणजे पेट्रोल- डिझेलचे दर रुपयांनी वाढतात व घटतात मात्र पैशांनी.
२४ दिवसानंतर पेट्रोलचे दर १७ पैशांनी तर डिझेलचे दर १८ पैशांनी घसरले आहेत. २४ दिवसापूर्वी नागपुरात पेट्रोल ९७.३९ रुपये तर डिझेल ८७.१० रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते. यात घसरण झाल्यानंतर बुधवारी पेट्रोलचे दर ९७.२१ रुपये तर डिझेलचे दर ८६.९२ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे. पेट्रोल आणि डिझेल हे एकप्रकारे दळणवळणाची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे यातील चढ-उतार हे जीवनाश्यक वस्तूंसोबतच अन्य सेवांवर प्रभाव पाडत असतात. पेट्रोल-डिझेलमधील ही अल्पशी घसरणही वस्तू व सेवांच्या किमतीवर समाधानकारक परिणाम पाडतील, अशी अपेक्षा बाजारातून व्यक्त केली जात आहे. देशातील काही राज्यात सुरू असलेल्या निवडणुकांच्या धुमाळीचा परिणाम म्हणूनही इंधनाच्या दरात ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी दिवसात आणखी घसरण होण्याचे भाकीतही पेट्रोलियमविषयक जाणकारांकडून केले जात आहे.
............