लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पीएम केअर फंडसंदर्भात प्रसिद्धीकरिता जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे असा आरोप केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. तसेच, ही याचिका खारीज करण्याची विनंती केली.नागपूर येथील अॅड. अरविंद वाघमारे यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, केंद्र सरकारने स्वत:ची बाजू स्पष्ट करताना याचिकेवर विविध आक्षेप घेतले. तसेच, याचिकाकर्त्याने याचिकेमध्ये एकही अंतरिम आदेशाची मागणी केली नाही याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिकाकर्त्याला अंतरिम आदेशाच्या मागणीसंदर्भात १९ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे निर्देश देऊन याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.कोरोना संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रभावित नागरिकांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी या फंडाची गेल्या २८ मार्च रोजी स्थापना करण्यात आली. या फंडमध्ये देश-विदेशातील सामान्य व्यक्तीपासून ते मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी आपापल्या शक्तीनुसार दान दिले आहे. त्यामुळे फंडमध्ये आतापर्यंत किती रक्कम जमा झाली याची माहिती जाहीर करण्यात यावी. फंडमधील जमा-खर्चाचे कॅगमार्फत आॅडिट करण्यात यावे. फंडच्या विश्वस्त मंडळातील तीन पदे तातडीने भरण्यात यावीत आणि तीनपैकी दोन विश्वस्त देशातील प्रमुख विरोधी पक्षांमधून नियुक्त करावेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.