हायकोर्ट : मिश्रांना दिलासा देण्यास नकारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्याची प्रा. सुनील मिश्रा यांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमान्य करून संबंधित फौजदारी रिट याचिका निकाली काढली. आज, बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांच्यासमक्ष याचिकेवर सुनावणी झाली. गेल्या तारखेला सीताबर्डी पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर करून सपकाळ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले होते. पोलिसांच्या तपासावर मिश्रा यांनी असमाधान व्यक्त केले. यामुळे न्यायालयाने त्यांना दिलासा मिळविण्यासाठी कायद्यात उपलब्ध अन्य माध्यमांचा अवलंब करण्याचे स्वातंत्र्य देऊन याचिका निकाली काढली. सपकाळ यांनी खोटे दस्तावेज व माहितीच्या बळावर कुलगुरूपद मिळविल्याचा मिश्रा यांचा आरोप होता. मिश्रा यांनी सपकाळ यांच्याविरुद्ध यापूर्वीही फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. २७ फेब्रुवारी २०१३ रोजी न्यायालयाने ही याचिका निकाली काढताना पोलीस आयुक्तांना सपकाळ यांच्याविरुद्ध मुंबई येथे दाखल एफआयआर कायद्यानुसार निर्णय घेण्यासाठी सीताबर्डी पोलिसांकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. यानंतर तपासावर असमाधान व्यक्त करून मिश्रा यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेऊन विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. दरम्यान, मिश्रा यांनी या पथकाच्या तपासावरही असमाधान व्यक्त करून जुनी याचिका पुनरुज्जीवित करण्यासाठी फौजदारी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिल्यामुळे मिश्रा यांनी हा अर्ज मागे घेतला होता. मात्र, त्यांना कायद्यात उपलब्ध अन्य मार्गानुसार दिलासा प्राप्त करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी ही फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. मिश्रा यांनी स्वत:, तर शासनातर्फे एपीपी संगीता जाचक यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
विलास सपकाळांविरुद्धची याचिका निकाली
By admin | Updated: July 24, 2014 00:58 IST