‘पेट’चे संकेतस्थळच ‘अपडेट’ नाही
By Admin | Updated: August 29, 2014 01:01 IST2014-08-29T01:01:57+5:302014-08-29T01:01:57+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘पेट’संदर्भात (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात येत होती. अखेर विद्यापीठाने ‘पेट’ची प्रक्रिया

‘पेट’चे संकेतस्थळच ‘अपडेट’ नाही
नागपूर विद्यापीठ : ५ सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू होणार
योगेश पांडे - नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘पेट’संदर्भात (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात येत होती. अखेर विद्यापीठाने ‘पेट’ची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून होणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे तंत्रज्ञानासंदर्भात मोठमोठे दावे करणाऱ्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याची माहितीच उपलब्ध नाही. याशिवाय ‘एमकेसीएल’तर्फे संचालित करण्यात येणाऱ्या ‘पेट’चे संकेतस्थळ ‘अपडेट’ करण्यात आलेले नाही. यामुळे ‘आॅनलाईन’ परीक्षेची माहिती ‘आॅनलाईन’च उपलब्ध नसल्याचा विरोधाभास दिसून येत आहे.
नागपूर विद्यापीठात ‘आॅनलाईन’ ‘पेट’ वर्षातून एकदा घेण्यात येते. दरवर्षी ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून या परीक्षेची प्रक्रिया राबविण्यात येते. परंतु विद्यापीठ प्रशासन व ‘एमकेसीएल’ यांच्यात देयकांच्या मुद्यावरील बऱ्याच काळापासून धुमसत असलेला वाद शिगेला पोहोचला अन् ‘एमकेसीएल’ने विद्यापीठाचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे ‘पेट’चे काय होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत होता.
अखेरीस ‘पेट’च्या प्रक्रियेच्या तारखा विद्यापीठाकडून घोषित करण्यात आल्या आहेत. ५ सप्टेंबरपासून ‘आॅनलाईन’ आवेदन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आवेदन करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. या ‘आॅनलाईन’ परीक्षेचे आयोजन इंग्रजी व मराठी भाषेत करण्यात येणार आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या सूचनेत ‘एमकेसीएल’तर्फे संचालित ‘पेट’च्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु संबंधित ‘ओअॅसिस.एमकेसीएल.ओआरजी.एनयूपीईटी’ या संकेतस्थळावर अद्यापही २०१३ या वर्षातील परीक्षेची माहिती उपलब्ध आहे. याशिवाय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत उमेदवारांपर्यंत या परीक्षेची माहिती नेमकी पोहोचणार कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.