बलात्कार पीडित युवतीला गर्भपाताची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 00:12 IST2021-06-19T00:11:33+5:302021-06-19T00:12:22+5:30
Permission to abort rape victim मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरातील एका २४ वर्षीय बलात्कार पीडित युवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. तिच्या गर्भात १७ आठवड्याचे बाळ आहे.

बलात्कार पीडित युवतीला गर्भपाताची परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरातील एका २४ वर्षीय बलात्कार पीडित युवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. तिच्या गर्भात १७ आठवड्याचे बाळ आहे.
न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी पीडित युवतीला हा दिलासा दिला. युवतीच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करण्यात आले होते. त्या मंडळाने न्यायालयात अहवाल सादर करून युवतीचा गर्भपात करणे शक्य असल्याचे मत दिले. त्यामुळे न्यायालयाने येत्या २१ जून रोजी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे युवतीचा गर्भपात करण्याचे निर्देश दिले. तसेच, हे बलात्काराचे प्रकरण असल्यामुळे पुराव्याकरिता बाळाचे रक्त व पेशी जतन करून ठेवण्यास सांगितले. अविनाश दोंडीराम भिमटे असे आरोपीचे नाव आहे. गणेशपेठ पोलिसांनी ४ मे २०२१ रोेजी पीडित युवतीच्या तक्रारीवरून भिमटेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो गजाआड आहे.