कायमस्वरूपी ‘नो पार्किंग’
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:30+5:302015-12-05T09:09:30+5:30
शहरात येणारे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ...

कायमस्वरूपी ‘नो पार्किंग’
विमानतळ ते राजभवन-रामगिरी : पोलिसांनी काढले आदेश
नागपूर : शहरात येणारे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते रामगिरी आणि राजभवन दरम्यानपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी कुठल्याही प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगवर पोलीस विभागातर्फे बंदी घालण्यात आली आहे. हे नो पार्किंग केवळ अधिवेशनापुरते मर्यादित नसून ते कायमस्वरूपी राहील हे विशेष.
नागपूर शहरात वेगवेगळ्या कामानिमित्त अनेक महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती भेट देत असतात. या व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांचे आवागमन हे मुख्यत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राजभवन आणि रामगिरी या दरम्यानच्या मार्गाने होत असते.
हा मार्ग अतिवर्दळीचा असून रस्त्याच्या कडेला असलेले रहिवासी व वेगवेगळ्या आस्थापनाचे मालक, कर्मचारीवर्ग व ग्राहक हे त्यांची वाहने मुख्य मार्गावर उभी करतात. वास्तविक ‘दि रुल्स आॅफ रोड रेग्युलेशन १९८९ मधील १५(२) अन्वये रस्त्यावर वाहने उभी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यानुसार वारंवार कार्यवाही करूनही बरीच वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. त्यामुळे अतिमहत्त्वाचे व महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहन ताफ्यास तसेच सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ शकतो. या बाबींचे गंभीर्य लक्षात घेऊन मार्गावरील वाहतूक व्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतूक नियमन करण्याच्या दृष्टीने सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोट कलम (१), (ब),(२),(६) अन्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राजभवन व रामगिरी दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहनांच्या पार्किंगवर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. (प्रतिनिधी)